मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. अशातच, राज्यात सर्वत्र ठाकरे बंधूंची चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन शनिवारी विजयी रॅलीचे आयोजन केले आहे. वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे शनिवारी विजयी मेळावा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे, मुंबई आणि ठाण्यासह राज्यभरात बॅनर लावण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे, या मेळाव्याचा टीझर आता प्रदर्शित झाला आहे. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी द्विगुणित झाला आहे.
टीझरमध्ये नेमकं काय?
शुक्रवारी सकाळी ठाकरे गटाच्या एक्स अकाउंटवर एक टीझर प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये 'आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा' हे वाक्य स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. या टीझरमध्ये ठाकरेंच्या चार पिढ्या म्हणजेच स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे भाषणादरम्यानचे फोटो दिसत आहे. त्यासोबतच, या टीझरमध्ये 'आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिलीय महाराष्ट्राला', 'वाजत गाजत गुलाल उधळत या', असा उल्लेखही करण्यात आला आहे.
'आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा. ज्या ज्या वेळी ठाकरेंनी महाराष्ट्राला साद घातली, त्या त्यावेळी मराठी माणूस एकवटला, लढला आणि भिडला. हिंदी सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करायचा पुन्हा प्रयत्न झाला, तेव्हाही महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले. आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिली महाराष्ट्राला. विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या. 5 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता एन.एस.सी.आय. डोम, वरळी, मुंबई येथे भव्य विजयी मेळावा होणार आहे', असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरातून कार्यकर्ते आणि मनसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना
5 जुलै रोजी राज्यभरातून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. नागपूरहून विदर्भातील मनसे कार्यकर्तेही मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. नागपुर येथील मनसेचे शहराध्यक्ष चंदू लाडे, जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर, शहराध्यक्ष विशाल बगे आणि दुर्गेश साकुलकर यांच्यासह 40 ते 50 प्रमुख पदाधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत. आगामी काळात ठाकरे बंधू एकत्र राजकारणात येतील अशी अपेक्षा मनसैनिकांना आहे आणि या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांच्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर या मेळाव्याचा किती प्रभाव पडतो आणि ठाकरे बंधूंच्या ऐक्याला किती बळकटी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.