प्रमोद पाणबुडे, प्रतिनिधी, वर्धा : वर्धा जिल्ह्यात सोमवारी कारसमोर वराह (डुक्कर) आल्याने झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मुळचे मांडगाव येथील रहिवासी प्रशांत वैद्य, प्रियंका वैद्य, माही उर्फ मनश्री वैद्य व प्रियांश वैद्य या चार जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. एकाच परिवारातील चौघांचा अपघातात मृत्यू झाल्याने वैद्य परिवारावर दु:खाचा डोंगरच कोसळला असून मांडगाव व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे संबंधित घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने मृतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी मांडगावात तोबा गर्दीच झाली होती. या घटनेमुळे मांडगावावर शोककळा पसली असून मंगळवारी मांडगावात चूलच पेटली नाही. वैद्य परिवारातील चारही मृतांचे पार्थिक मांडगाव येथे मंगळवारी दुपारी 3.15 वाजता आणण्यात आले. याच ठिकाणी अनेकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर चारही पार्थिव वर्धा येथील वैद्य यांच्या प्रतापनगर येथील निवासस्थानी आणण्यात आले. याच ठिकाणाहून अंत्ययात्रा काढून चारही मृतांवर मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रशांत वैद्य हे वडनेर पोलीस ठाण्यात बिट जमादार म्हणून सेवा देत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाकडे धाव घेतली. नागपूर येथील रुग्णालयात प्रशांत यांची प्राणज्योत मालवली. प्रशांतसह पत्नी व दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने पोलीस विभागातही हळहळ व्यक्त केली जात आहे. मांडगाव येथून प्रशांत वैद्य, प्रियंका वैद्य, माही वैद्य, प्रियांश वैद्य यांचे पार्थिव वैद्य यांच्या वर्धा येथील प्रतापनगर येथील निवासस्थानी दुपारी आणण्यात आले. याच ठिकाणाहून दोन तिरड्यांवर संबंधित चौघांची अंत्ययात्रा काढण्यात आली. आईच्या तिरडीवर मुलगी तर वडिलांच्या तिरडीवर मुलाचे पार्थिव होते. वर्धा येथील मोक्षधामात या चौघांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस उपअधीक्षक (गृह) भटकर, हिंगणघाटचे उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा : सैफ अली खान मारहाण प्रकरणात मलायका अरोरा विरोधात वॉरंट
तीन फैऱ्या झाडून पोलिस विभागाची सलामी
वैद्य कुटुंबातील चार जणांची अंत्ययात्रा वर्धा येथील मोक्षधामात आल्यावर तिथे हवेत बंदुकीच्या तीन फैऱ्या झाडून पोलिस कर्मचारी प्रशांत वैद्य व प्रशांतची पत्नी प्रियंका, मुलगा प्रियांश, मुलगी माही यांना पोलिस विभागाच्या वतीने सलामी देण्यात आली. यावेळी पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
भावाने धरले आकट
भीषण अपघातात मृत्यू झालेल्या चौघांचे पार्थिव वैद्य यांच्या वर्धा येथील प्रतापनगर भागातील निवासस्थानी मंगळवारी दुपारी आणण्यात आले. याच ठिकाणाहून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंतयात्रेदरम्यान प्रशांतचा मोठा भाऊ भुषण वैद्य यांनी आकट धरले. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर अंत्ययात्रा इतवारा भागातील मोक्षधामात पोहोचली. याच ठिकाणी संबंधित चौघांच्या पार्थिवावर अंत्यसंसकार करण्यात आले. भीषण अपघातात वैद्य कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने वैद्य कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.