मुंबई: शुक्रवारपासुन महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या दरम्यान, अनेक शिवभक्त शिवमंदिरात जाऊन महादेवांची विधीवत पूजा करतात. यासह, शिवभक्त विविध शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर दुग्दाभिषेक, रूद्राभिषेक आणि पंचामृत अभिषेकही करतात. या काळात, अनेक धार्मिक परंपरा, व्रत, उपवास करून महादेवांची पूजा करतात. मान्यतेनुसार, असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. चला तर सविस्तर जाणून घेऊया मुंबईतील प्रसिध्द शिव मंदिर.
1 - अंबरनाथ शिवमंदिर: मुंबईतील अंबरनाथ येथे असलेले हे शिवमंदिर प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अकराव्या शतकात बांधले गेले आहे. या मंदिराचे बांधकाम राजा छित्तराज यांच्या राजवटीत पूर्ण झाले आहे. हे मंदिर वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, हे मंदिर एका मोठ्या दगदावर कोरलेले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी याठिकाणी मोठी यात्रा भरते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात. हे मंदिर अंबरनाथ रेल्वे स्टेशनपासून सुमारे 2 किमी अंतरावर आहे.

2 - धाकलेश्वर महादेव मंदिर: हे मंदिर महालक्ष्मी मंदिरापासून जवळ आहे आणि हे मंदिर सुमारे 200 वर्षे जुने आहे. विशेष म्हणजे, येथील शिवलिंग स्वयंभू आहे. 1835 मध्ये बांधलेले हे मंदिर मुंबईतील दुसरे सर्वात जुने शिव मंदिर आहे. 2008 मध्ये नूतनीकरणानंतर मंदिर भाविकांसाठी पुन्हा उघडण्यात आले. महाराष्ट्रासह जगभरातून भाविक याठिकाणी महादेवांच्या दर्शनासाठी येतात.

3 - बाबुलनाथ महादेव मंदिर: बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या एका छोट्या टेकडीवर आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या मंदिरात येतात. हे मंदिर मरीन ड्राइव्हच्या शेवटी आणि मलबार हिलच्या दक्षिणेस आहे, जे 1780 मध्ये बांधले गेले होते. तसेच 1900 मध्ये, भगवान शिवाच्या या शुभ, मूळ मंदिरात एक उंच शिखर जोडण्यात आले. या मंदिरात पोहोचण्यासाठी जवळचा रेल्वे मार्ग मरीन लाईन्स आहे.

4 - वाळकेश्वर मंदिर: मुंबईतील मलबार हिल्स येथे असलेले वाळकेश्वर मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे. याठिकाणी, अनेक प्राचीन आणि स्वयंभू शिवमंदिर आहेत. असे मानले जाते की, त्रेतायुगात जेव्हा प्रभु श्रीराम 14 वर्षांच्या वनवासात होते, तेव्हा माता सीता यांना तहान लागली होती. तेव्हा प्रभु श्रीरामांनी येथे बाण मारले होते, ज्यामुळे याठिकाणी पाण्याचा स्त्रोत निर्माण झाला आणि याला बाणगंगा तलाव असे देखील ओळखले जाऊ लागले.

(DISCLAIMER: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)