नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आहे. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा करत, 'पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला. या घटनेनंतर नागपूरमध्ये तणावाचे वातावरण असून पोलिसांकडून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सकाळी शांतता होती. मात्र, संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला. 'पोलिसांना एक ट्रॉली भरून दगड सापडले. वरून दगड जमा करून ठेवण्यात आले होते. एका डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आला. या हल्ल्यामागे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न होता,' असे त्यांनी सांगितले.पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देत फडणवीस म्हणाले, 'कोणालाही कायदा-सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार नाही. पोलिसांवर हल्ला सहन केला जाणार नाही. शांतता प्रस्थापित करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा आहे, याला सरकार मुळीच माफ करणार नाही.'
प्रवीण दटके यांचा आरोप – ‘ही घटना पूर्वनियोजित’
हिंसाचारानंतर भाजप आमदार प्रवीण दटके यांनीही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी हिंसाचारग्रस्त हंसपुरी भागात भेट दिली आणि माध्यमांशी संवाद साधताना या घटनेला ‘पूर्वनियोजित’ ठरवले.'ही सर्व घटना नियोजनबद्ध होती. जर हिंदू आणि मुस्लिमांची प्रत्येकी दोन दुकाने असतील, तर फक्त हिंदूंच्या दुकानांवर हल्ला झाला. एका मुस्लिमाच्या स्टॉलला काहीही झाले नाही, मात्र एका वृद्ध महिलेच्या स्टॉलचे नुकसान करण्यात आले. यावरूनच हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते,' असे दटके यांनी म्हटले.त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जमाव मोठ्या प्रमाणावर बाहेरून आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आणि पोलिसांनी वेळेत कारवाई का केली नाही, असा सवाल केला.
हेही वाचा: नागपुरात हिंसाचारानंतर तणावपूर्ण शांतता, 80 जणांना अटक, 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू
चंद्रशेखर बावनकुळे यांची कठोर भूमिका
राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या घटनेबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, 'नागपूरमध्ये याआधी अशी घटना कधीच घडली नाही. ज्या लोकांनी नागपूरला गालबोट लावले, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.'
बावनकुळे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, चुकीच्या माहितीचा प्रसार टाळण्याचा सल्ला दिला. 'या प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि खरे कारण समोर येईल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमोल मिटकरी यांचा संताप – ‘अशा घटना अशोभनीय’
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “नागपूरसारख्या शांत शहरात अशा प्रकारच्या दंगली घडणे अशोभनीय आहे.”शिवाय, वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली जाते, यावर टीका करताना मिटकरी म्हणाले, 'मोदींची शिवरायांशी तुलना करणे हा मूर्खपणा आहे.'
नागपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त
या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू असून संशयितांची चौकशी केली जात आहे.नागपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागेल, असे स्पष्ट संकेत राज्य सरकारने दिले आहेत.