नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. सकाळी 8:46 वाजता, पोलिस नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर आलेल्या फोनमुळे खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ पावले उचलून शोध मोहीम राबवली. त्यानंतर काही तासांतचं आरोपीला अटक करण्यात आली.
धमकीचा फोन मिळताच प्रतापनगर पोलिस ठाण्याचे पथक सक्रिय झाले. श्वान पथक, बॉम्ब शोध पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गडकरी यांच्या निवासस्थानी तपासणी मोहीम राबवण्यात आली. प्राथमिक तपासानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - ''देशात गरीबी वाढत आहे आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'' - नितीन गडकरी
काही तासांतच आरोपी अटकेत
फक्त काही तासांतच पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव उमेश विष्णू राऊत असे असून, तो मेडिकल चौकातील देशी दारू दुकानात काम करत होता. त्याला बिमा रुग्णालयाजवळून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून, त्याच्या मानसिक स्थितीचा आणि धमकी देण्यामागील हेतूचा तपास केला जात आहे.
हेही वाचा - ''तेव्हा घरावर दगडफेक करणारे आज भाजपमध्ये आहेत...''; नितीन गडकरींचे वक्तव्य
नितीन गडकरी नागपूरमध्येच उपस्थित
या घटनेदरम्यान नितीन गडकरी नागपूरमध्येच उपस्थित असल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली होती. पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवली असून, या प्रकरणात इतर कोणतीही व्यक्ती सहभागी आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. नागपूर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा प्रकार अत्यंत गंभीर असून, यामागील पूर्ण पार्श्वभूमी तपासली जाईल. कोणत्याही प्रकारचा धोका किंवा गोंधळ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.