नांदेड: नांदेडमध्ये मजूर घेऊन जाणार ट्रॅक्टर विहिरीत कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात सात मजूर ठार झाले आहेत. तर तिघींना वाचवण्यात यश मिळाले आहे. घटनेनंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत कोसळला. ट्रॅक्टरमध्ये दहा मजूर होते. त्यापैकी दोन महिला मजूर बाहेर निघाल्या. आठ मजूर 70 फूट पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती. पोलीस, महसूल प्रशासनाचे तसेच फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.
हेही वाचा : मनसेची थेट जुईनगर एसबीआय बँकेला भेट; ट्रांजेक्शन पावत्या मराठीत करण्याची मागणी
नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी जवळच असलेल्या गुंज येथील महिला व अन्य मजूर असे दहा मजूर एका ट्रॅक्टरमधून जात होते. ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या 70 फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळला. दोन जनरेटर वापरून व कृषी पंपाच्या साह्याने पाणी उपसा सुरू करण्यात आला. निळा, आलेगाव, गुंज येथील गावकरीही घटनास्थळी अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेत तिघांना वाचवण्यात यश मिळाले असून सात महिला मजूर ठार झाले आहेत.
नांदेड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाखांचे अर्थसहाय्य मिळणार
नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील महिला शेतीकामासाठी जात होत्या. विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली आहे.