मुंबई: कुर्ला आयटीआय परिसरातील नागरी अर्बन फॉरेस्ट आणि तरण तलावावरून मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार आदित्य ठाकरे आमनेसामने आले आहेत. आदित्य ठाकरेंनी हजाराहून अधिक झाडं तोडून तरण तलाव उभारण्याचा गंभीर आरोप मंत्री लोढांवर केला आहे. यावर, लोढांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले मंत्री लोढा?
'तरण तलाव नाही, तर खेळांचे मैदान उभे राहत आहे. आदित्य ठाकरे रोहिंग्या आणि बांगलादेशींना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत', अशी घणाघात टीका मंत्री लोढांनी केली आहे. 'गेल्या दोन महिन्यांपासून कुर्ला आयटीआयच्या मागे शिवकालीन देशी क्रीडा मैदान विकसित करण्याचे काम सुरू आहे. १३ ऑगस्ट रोजी अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीच्या निमित्ताने या मैदानावर देशी आणि पारंपारिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाईल. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून मागच्या बाजूला एक वेगळा पदपथ आणि प्रवेशद्वार बांधण्यात येत आहे. मात्र, हे काम सुरू असताना, 'रोहिंग्या-बांगलादेशींच्या झोपड्यांना अडथळा येईल', अशी भीती दाखवत आदित्य ठाकरे मंत्री लोढा यांच्यावर राजकीय आरोप करत असल्याचा टोला लोढांनी लगावला आहे. 'मुंबईत प्रथमच मराठमोळ्या देशी खेळांचं मैदान उभं राहत आहे. याचं स्वागत करण्याऐवजी परप्रांतीय आणि बेकायदेशीर झोपडपट्टीधारकांना वाचवण्यासाठी खोटे आरोप करणे योग्य नाही', असं देखील मंत्री लोढा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
नेमकं प्रकरण काय?
'गेल्या वर्षी कुर्ला येथील आयटीआय परिसरात लावलेल्या ९ हजार झाडांचे 'शहरी वन' नष्ट करून त्या जागी तरण तलाव बांधण्याचा प्रयत्न मंत्री मंगलप्रभात लोढा करत आहेत', असा गंभीर आरोप मंत्री लोढांवर आदित्य ठाकरे यांनी सोमवारी एक्सच्या माध्यमातून केला आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
'ही संपूर्ण लागवड हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीच्या सीएसआर निधीतून झाली आहे. हे अर्बन फॉरेस्ट शहरासाठी मोठी देणगी आहे आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न अतिशय निष्काळजीपणाचे आणि धोकादायक आहे'. यानंतर, आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारचे पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांना या पोस्टमध्ये टॅग करत विनंती केली आहे की, 'या प्रकारात त्वरित हस्तक्षेप करावा, कारण हे झाड तोडण्याचे काम आज रात्री सुरू होणार आहे, असा अंदाज आहे'. 'शहराच्या भविष्यासाठी हानिकारक आणि पूर्णतः अमानवी कृत्य', असे देखील ठाकरेंनी संबोधले.