Thursday, August 21, 2025 03:36:26 AM

आरोग्य विभागाचे अपयश; रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने महिलेची रस्त्यावरच करावी लागली प्रसूती

चोपडा तालुक्यातील आदिवासी महिलेची रस्त्यावर प्रसूती; वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्यामुळे दुचाकीवर वैजापूर कडे नेताना मदतीने प्रसूती झाली, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.

आरोग्य विभागाचे अपयश रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने महिलेची रस्त्यावरच करावी लागली प्रसूती

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावातील एका 24 वर्षीय आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संताबाई बारेला या महिलेला 21 मे रोजी प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तिच्या पतीने अँब्युलन्ससाठी प्रयत्न केले. मात्र वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्यामुळे त्याने तिला दुचाकीवरून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र वैजापूर कडे नेण्यास सुरुवात केली. परंतु केंद्रापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असताना रस्त्यावरच तिच्या प्रसूती झाली.

या प्रसंगी दोन महिलांनी अंगणवाडी सेविका आणि प्रशिक्षित मिडवाइफ यांच्या मदतीने प्रसूती घडवून आणली. एका व्हिडिओमध्ये दिसते की चार महिलांनी एक साडी पकडून आडोसा तयार केला आणि त्यामागे प्रसूती झाली. व्हिडिओमध्ये संताबाईचा पती विश्‍वनाथ म्हणताना ऐकू येतो की ते अर्धा तासापेक्षा अधिक वेळ मदतीसाठी वाट पाहत होते, पण कोणीच आले नाही.

हेही वाचा: शिरसाटांकडे 67 कोटींची प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी पैसे आले तरी कुठून? संजय राऊतांचा गौप्यस्फोट

या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'ज्या जिल्ह्यात तीन मंत्री आहेत, तिथे अशा प्रकारची घटना घडते, ही सरकारसाठी शरमेची बाब आहे.' त्यांनी या घटनेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि पीडित महिलेला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

दुसरीकडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, प्रसूती दरम्यान संताबाई यांच्यासोबत एक अंगणवाडी सेविका आणि प्रशिक्षित मिडवाइफ उपस्थित होत्या. त्यांनीच प्रसूती केली आणि लगेचच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली गेली. त्यानंतर अँब्युलन्स पाठवण्यात आली.

या घटनेमुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे


सम्बन्धित सामग्री