वरोरा: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील अर्जुनी शेगाव या गावात महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे एक गरीब कुटुंब अडचणीत सापडलं आहे. दादा लतारू भोयर नावाच्या शेतमजुराला जुलै महिन्यासाठी तब्बल 77,110 इतकं वीज बिल प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरात केवळ दोन बल्ब आणि एक पंखा आहे. तरीही वीज वापर 3841 युनिट इतका दाखवण्यात आला आहे.
वीज बिल पाहून भोयर कुटुंबाला झटका -
प्राप्त माहितीनुसार, चार सदस्यांचे भोयर कुटुंब अत्यंत साध्या घरात राहते. कोणतंही मोठं उपकरण नसतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीज वापर दाखवला गेल्याने भोयर यांना जबरदस्त धक्का बसला. गेल्या वर्षभरात त्यांचा मासिक सरासरी वीज वापर 50 युनिटच्या खाली होता. ऑगस्ट 2024 मध्ये केवळ 106 युनिट वापर झाला होता. त्यामुळे एकाच महिन्यात इतका वाढलेला आकडा म्हणजे स्पष्ट चुकीचा हिशेब होता.
महावितरणकडून 'तांत्रिक चूक' असल्याची कबुली -
दरम्यान, भोयर यांनी हे बिल पाहताच 23 जुलै रोजी स्थानिक सहाय्यक अभियंता संतोष खोब्रागडे यांच्याकडे तक्रार केली. यावेळी त्यांना सांगण्यात आले की, 'ही एक तांत्रिक चूक आहे.' अधिकाऱ्यांनी 1 हजार रुपये विजबिल भरण्याचा सल्ला दिला. पुढील महिन्यात हे बिल समायोजित केलं जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा - घराच्या छतावर कोणता सोलर पॅनल बसवावा, त्यातून किती वीज निर्माण होईल? जाणून घ्या
महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह -
या प्रकरणामुळे महावितरणच्या प्रणालीवर आणि कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नियमितपणे बिल भरणाऱ्या ग्रामीण नागरिकाला असा चुकीचा आणि मोठ्या रकमेचा बिल मिळणं, ही केवळ चूक नसून निष्काळजीपणाचा उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा - एका महिन्याचे लाईट बिल 1.50 लाख रुपये! लातूरमध्ये वीज विभागाने संपूर्ण गावाला ठोठावला वीज चोरीसाठी दंड
ग्राहकांसाठी मोठा इशारा -
या घटनेमुळे हजारो ग्राहकांसाठी सतर्कतेचा इशारा मिळाला आहे. ग्राहकांनी दर महिन्याचं बिल तपासणं, वाचनात तफावत आढळल्यास तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. अन्यथा भोयर यांच्यासारखा विजबिलाचा झटका कोणालाही बसू शकतो.