Nashik House Collapse: नाशिक शहरातील खडकाळी परिसरात बुधवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. येथे असलेले दुमजली घर अचानक कोसळले, ज्यात आठ महिलांसह एकूण नऊ जण जखमी झाले. ही इमारत अन्वर शेख यांच्या मालकीची होती. ही इमारत शमा युसुफ खान यांच्या कुटुंबाला भाड्याने दिलेली होती.
घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरु केले. ढिगाऱ्यातून वाचविण्यात आलेल्यांमध्ये मोहसीना खान (40), नासिर खान (55), अक्सा खान (26), मुद्दसिर खान (21), आयेशा खान (15), आयेशा शेख (12), हसनैन शेख (7) आणि झोया खान (22) यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - Buldhana Shocker: शिळ्या अन्नावरून बाप-लेकात वाद; मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून नदीत फेकला
घटनास्थळी घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घराबाहेर उभ्या असलेल्या पाच दुचाकींचेही नुकसान झाले आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात घराच्या खराब बांधकामामुळे झाला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन संबंधित प्रकरणी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हे दिसून आले आहे की, घराचे बांधकाम निकृष्ट असल्याने इमारत सुरक्षित नव्हती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - Gas Leak at Pharma Company in Boisar: बोईसरमध्ये फार्मा कंपनीत गॅस गळती; 4 कामगारांचा मृत्यू
या दुर्घटनेने खडकाळी परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने रहिवाशांना इमारतींच्या सुरक्षिततेची खात्री करून घेण्यास सांगितले आहे, तसेच नागरिकांना कोणत्याही धोकादायक इमारतींच्या जवळ न राहण्याचे आवाहन केले आहे. ही घटना पुन्हा एकदा घरांच्या सुरक्षित बांधकामाची गरज अधोरेखित करते.