मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मोदी सरकारने जागतिक व्यासपीठावर भारताची बाजू मांडण्यासाठी 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून हे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देतील. या शिष्टमंडळातील सदस्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश करण्यात आला आहे. आता यावर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदींनी खासदारांची एक टीम तयार केली असून ती इतर देशांमध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरवर देशाची बाजू मांडेल. काल मला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा फोन आला आणि त्यांनी मला शिष्टमंडळाचा भाग होण्यास सांगितले. जेव्हा देशाचा विचार येतो तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र असतो. आम्ही इतर देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडू. बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांचा प्रतिनिधी म्हणून जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. मतदारसंघातील लोकांनी सतत दिलेला विश्वास, अतूट प्रेम आणि सेवेची संधी यामुळेच हे शक्य झाले आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - व्यापाऱ्यांनी शिकवला तुर्कीला धडा! तुर्की सफरचंदांऐवजी काश्मिरी सफरचंद खरेदी करण्याचा घेतला निर्णय
पाकिस्तानचा पर्दाफाश करण्याची योजना -
सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, प्रत्येक समितीमध्ये 5 सदस्य असतील, जे पुढील 10 दिवसांत 5 ते 8 देशांना भेट देतील. हा दौरा 23-24 मे रोजी सुरू होईल. भारताने पाकिस्तानला राजनैतिक पातळीवर उघड करण्याची योजना तयार केली आहे. यासाठी, खासदारांची टीम जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानचा पर्दाफाश करेल. शिष्टमंडल जगाला भारताच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दौरा 23 मे पासून सुरू होईल आणि पुढील 10 दिवस चालेल.
हेही वाचा - ट्रम्प तुर्कीला 304 दशलक्ष डॉलर्सची क्षेपणास्त्रं देणार; Boycott Turkey नंतर अमेरिकेविरोधात देशात ही मागणी
खासदार अनेक देशांमध्ये जाऊन मांडणार भारताची बाजू -
सरकारने निवडलेले खासदार अमेरिका, ब्रिटन, यूएई, दक्षिण आफ्रिका आणि जपान सारख्या देशांना भेट देतील. काश्मीर आणि पाकिस्तानमधून होणाऱ्या सीमापार दहशतवादाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने खासदारांची एक टीम तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यामध्ये पाकिस्तान आणि व्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले.