मुंबई : अनंत चतुर्दशी रोजी मुंबईसह महाराष्ट्र तसेच देशातील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश मंडळं असून येथील मोठमोठाले गणपती मूर्ती समुद्रामध्ये विसर्जित करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाळी वातावरणामुळे आणि बदलत्या हवामानामुळे त्याचा परिणाम समुद्रावरही होणार असल्याचे दिसून येईल. परिणामी, शनिवार, 6 सप्टेंबर 2025 रोजी भरती-ओहोटीचा खेळ पाहायला मिळेल. उद्या समुद्रात सकाळी 11.09 वाजता 4.20 मीटरची भरती, सायंकाळी 5.13 वाजता 1.41 मीटरची ओहोटी तसेच रात्री 11.17 वाजता 3.87 मीटर उंचीची भरती असेल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, 7 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 5.06 मिनिटांनी 0.69 मीटरची ओहोटी, सकाळी 11.40 वाजता 4.42 मीटरची भरती असेल. विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांनी भरती व ओहोटीदरम्यान सतर्क राहावे, असे आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे.
हेही वाचा : Pune Ganesh Visarjan 2025: पुण्यात गणेश विसर्जनानंतर मूर्तींचे फोटो-व्हिडिओ काढण्यास मनाई; प्रशासनाचा कडक आदेश
मत्स्यदंशापासून बचाव करा
ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. त्यामुळे विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला असून 108 रूग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.
कृत्रिम तलावांची माहिती
यंदा मुंबईत महापालिकेच्यावतीने सुमारे 290 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/HomePage%20Data/Whats%20New/ganpati_art_ponds.pdf या लिंकवर कृत्रिम तलावांची यादी उपलब्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये संबंधित कृत्रिम तलावाची गुगल मॅप लिंकही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, क्यूआर कोड स्कॅन करुन किंवा बीएमसी व्हॉटसअॅप चॅटबॉट 8999-22-8999 या क्रमांकावरुनही कृत्रिम तलावांसंबंधित माहिती जाणून घेता येईल.
हेही वाचा : Ganesh Visarjan 2025 : सहकार्य करा! अनंत चतुर्दशीनिमित्त महापालिकेचं गणेशभक्तांना आवाहन; वाचा सविस्तर माहिती
विसर्जनादरम्यान अशी घ्या काळजी
विसर्जनावेळी भाविकांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नये.
मूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेमार्फत नेमलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी.
काळोख असणाऱ्या ठिकाणी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाणे टाळावे.
महानगरपालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.
समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवरक्षकांना कळवावे.
कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
भाविकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात जाऊ देऊ नये.