मुंबई: महाराष्ट्रात नुकतच संजय शिरसाट यांचा हातात सिगारेट, बाजूला पैशांची बॅग आणि पाळीव श्वान असलेला व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला. तसेच संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टिनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केलीय यावरुन महाराष्ट्रात सर्व संजय नावाच्या व्यक्ती चर्चेत असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला. तसेच संजय गायकवाड यांना एकनाथ शिंदे यांनी समज दिली असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
'एखाद्या गरीब माणसाला बेदम मारणं चुकीचं'
सर्व संजय नावांच्या व्यक्ती महाराष्ट्रात चर्चेत आहेत. संजय शिरसाट, संजय गायकवाड आणि संजय राऊत हे सर्व संजय चर्चेत आहेत. संजय गायकवाड यांना एकनाथ शिंदे यांनी समज दिली आहे असे महाजन यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना एखाद्या गरीब माणसाला असं बेदम मारणं करणं अतिशय चुकीचे आहे. ज्याला मारलं तो मॅनेजर होता. एखादी गोष्ट कमी, जास्त होऊ शकते. परंतु असं बेदम मारणं हा मार्ग नाही असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: 'पैशाची चिंता नाही, एखादी बॅग... ; मंत्री संजय शिरसाटांचा आणखी एक व्हिडिओ समोर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना कडक समज दिली आहे. मी बाहेरगावाहून आलो आणि बसलो होतो. त्या बागेमध्ये कपडे होते असे संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे. तर संजय राऊत उठून काहीही बोलतात याला काही अर्थ नाही. त्यांना कोणी थांबवू शकणार नाही असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
संजय नावाच्या व्यक्ती चर्चेत?
आकाशवाणी आमदार निवासातील जेवण निकृष्ट दर्जाचे होते. वरण खराब असल्याने आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टिनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदार निवासातील खराब वरण खाल्ल्याने आमदार गायकवाड यांना मळमळ सुरु झाली. त्यामुळे त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला मारहाण केली. तसेच मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हातात सिगारेट, बाजूला पैशांची बॅग आणि त्यांचा पाळीव श्वान पाहायला मिळाला. त्यामुळे संजय शिरसाटांवर टीकेचा वर्षाव सुरु झाला. एवढे पैसे बॅगमध्ये का ठेवले? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला. यावर मी बाहेरुन आलो होतो. म्हणून ती बॅग बाहेर होती आणि एवढेच पैसे असते तर मग कपाटात ठेवले नसते का? असे स्पष्टीकरण शिरसाटांनी दिले. तर संजय राऊत रोज काहीही बोलत असतात असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या संजय नावाच्या व्यक्तीची चर्चा असल्याचेही त्यांनी सांगितले.