मुंबई: गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. अशातच, गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आगामी गणेशोत्सवाबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. 'महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून ओळखला जाईल', अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली आहे.
'गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा', अशी मागणी पुण्यातील कसबा पेठचे भाजप आमदार हेमंत रासने यांनी केली होती. यावर राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी हेमंत रासने यांचे आभार मानले. 'महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा 1893 रोजी लोकमान्य टिळक यांनी सुरू केला होता. त्यापूर्वी घरोघरी हा उत्सव सुरू होता. महाराष्ट्र राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे आजच मी स्षप्टीकरण देतो. देशात आणि जगात गणेशोत्सवाची व्यापती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहिल', अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
हेही वाचा: डॅमेज कंट्रोलसाठी जुलै अखेरीस उद्धव ठाकरे करणार नाशिक दौरा?
'विसर्जन परंपरागत पद्धतीनेच' - शेलार
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाबद्दल अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे. पीओपी मूर्तींवरील असलेले निर्बंध हटवण्यात आले असून, गणपतीचे विसर्जन परंपरागत पद्धतीनेच करावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारे अडथळा ठरणार नाही', अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
'तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी शंभर वर्षांच्या परंपरेला खंडित केले' - शेलार
यादरम्यान, आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत म्हणाले की, 'शंभर वर्षांच्या परंपरेला जर कोणी खंडित केले असेल, तर ते तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी केले होते. लालबागचा राजा देखील एक वर्ष बसला नाही. ही भूमिका तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. गणेशोत्सवावर काही लोकांनी ‘स्पीडब्रेकर’ आणले होते, पण आपल्या सरकारने ते दूर केले आहे', असं आशिष शेलार म्हणाले.