Monday, September 01, 2025 12:58:47 AM

बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेला सोमवारपासून सुरुवात

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून 7/12 कोरा यात्रा सुरू होत आहे.

बच्चू कडूंच्या 712 कोरा यात्रेला सोमवारपासून सुरुवात

अमरावती: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून 7/12 कोरा यात्रा सुरू होत आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मस्थान असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पापळ गावातून ही यात्रा सुरू होईल. सात दिवस चालणाऱ्या या पदयात्रेत उंबरदा बाजार, मानकी, वळसा, तिवारी, तुपटकली, काली दौलत, गुंज या गावांमधून 138 किलोमीटर पायी प्रवास केला जाईल. यात्रेचा शेवट चिलगव्हाण गावात होईल, जिथे देशातील पहिल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.

हेही वाचा: 'देशात गरीबी वाढत आहे आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये' - नितीन गडकरी

बच्चू कडू म्हणाले की, 'विधानसभा अधिवेशनादरम्यान अनेक मंत्र्यांच्या बैठका झाल्या. मात्र, कर्जमाफीची तारीख जाहीर झाली नाही. सरकारकडून ठोस निर्णय न घेतल्यामुळे हा मोर्चा काढला जात आहे. शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आंदोलनाची तीव्रता कायम ठेवण्यासाठी हा उपक्रम आहे'. 'गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, ज्यामध्ये देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत', अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली. 

हेही वाचा: 'सॉरी नॉट प्राडा, माझी चप्पल रिअल कोल्हापूरची'; करीना मिरवली कोल्हापुरी चप्पल

'आम्ही आता जाती, धर्म आणि राजकीय विचार बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी एकत्र आलो आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा रिकामा होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. त्यांनी सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना एकत्र येऊन कर्जमाफीसाठी एकत्रितपणे लढण्याचे आवाहन केले आहे. मत कोणालाही द्या, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक व्हा', असंही बच्चू कडू यांनी नमूद केले. 


सम्बन्धित सामग्री