मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे संपादक राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. दरम्यान, या मुलाखतीचा पहिला भाग शनिवारी सकाळी 'सामना'च्या युट्युब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र, या मुलाखतीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. 'नाचता येईना अंगण वाकडं', असं म्हणत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना एक्सच्या माध्यामातून टोला लगावला आहे.
उपाध्येंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला
शनिवारी सकाळी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्स पोस्ट केली, ज्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. केशव उपाध्ये म्हणाले की, 'नाचता येईना अंगण वाकडे. उद्धवराव आज तुम्ही @SaamanaOnline मुलाखतीत जी टीका टिप्पणी केली, ती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात यश मिळाले त्यावेळी निवडणूक आयोगाबद्दल आणि ईव्हीएमबद्दल तुमची तक्रार नव्हती. विधानसभेला अपयश आल्यावर मात्र बॅलट पेपरवर मतदानाची मागणी करू लागलात'.
पुढे, केशव उपाध्ये म्हणाले की, 'निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो पण शिवसेना हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाही, असे आपण म्हटले आहे. संपूर्ण मुलाखत अशा विरोधाभासाने भरलेली आहे. पण तरीही तुमच्या मुलाखतीमधील काही कबुलीची वक्तव्ये आवडली.... मी कोणी नाही. मी शुन्य आहे. उद्धव ठाकरे याला अर्थ नाही.... लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचं आहे हे आपलेपण होतं, विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्यात जो मीपणा आला तेव्हा पराभव झाला'.