मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय येथे तिरंगा फडकावला. त्यानंतर, मुख्यमंत्री फडणवीसांनी भाषण दिले. या भाषणादरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, फडणवीस म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले'.
ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. ज्याप्रकारे, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या सेनेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व दहशतवाद्यांचे आणि पाकिस्तानचे लष्करी लक्ष्य ध्वस्त केले आणि त्यातून भारतावर आलेले हल्ले ज्याप्रकारे परतून लावले. त्यामुळे, जगाला देखील नवा भारत काय आहे? हे या ऑपरेशन सिंदूरमुळे समजले आहे. म्हणून, ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या ज्या आमच्या सनेच्या अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी सहभाग घेतला, त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो'.
पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
'आज खरं म्हणजे देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेत्तृत्वात आपला भारत देश सातत्याने प्रगती करत आहे आणि केवळ एका दशकात भारताने अकराव्या जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थेपासून ते जगातल्या चौथ्या अर्थव्यवस्थेपर्यंत एक मोठी मजल मारलेली आहे. आज भारताची विकासगाथा हे कोणी थांबवू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याप्रकारे, विविध क्षेत्रांमध्ये भारत प्रगती करत आहे, आणि आता तर स्पेसच्या जगातही ज्याप्रकारे भारताने आपलं पाऊल ठेवलं आहे, मला असं वाटतं की आता ही विकासगाथा थांबणार नाही. पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आत्मनिर्भर भारताचा जो नारा आहे, हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील. भारताला आत्मनिर्भर करण्याकरिता जगातलं जे उत्पादन आहे, जगातल्या ज्या व्यवस्था आहे, त्या सगळ्या भारतामध्ये उभ्या कराव्या लागतील, तयार कराव्या लागतील. सगळा नवाचार, स्टार्टप्स, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी भारतात तेवढ्याच सर्मथपणे आपल्याला उभ्या कराव्या लागतील आणि त्या दिशेने भारताची वाटचाल चालली आहे'.