मुंबई: आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवणावरुन आमदार निवासातील कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. यावरुन रान पेटलं आहे. गायकवाडांवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. तर महायुतीचे नेते सारवासारव करत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणालाही मारहाण करणं योग्य नसल्याचे शिंदेंनी म्हटले आहे.
आमदार निवासातील वरण खाल्ल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांना मळमळ सुरु झाली. त्यामुळे त्यांनी कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. यावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. आमदार निवासातील निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे सगळ्यांना त्रास होऊ शकतो. ते जेवण खाल्ल्यामुळे त्यांना उलटी झाली. म्हणून रागाच्या भरात त्यांनी ते कृत्य केलं. मात्र आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे. कायदेशीर कारवाई करायचे अधिकार त्यांना आहेत. कोणालाही मारहाण करणं योग्य नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: 'अशाप्रकारे टॉवेलवर एका आमदारानं मारहाण करायची का?'
आमदार निवासात निकृष्ट जेवण मिळाल्याने आमदार संजय गायकवाड भडकले. त्यानंतर त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप - प्रत्यारोप झाले. यावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड यांना समज दिली असल्याचेही शिंदेंनी सांगितले आहे.
नेमकं काय झालं?
आकाशवाणी आमदार निवासात निकृष्ट जेवण देण्याचा प्रकार घडला आहे. मंत्रालयासमोरील कॅन्टीनला शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी रूम नंबर 107 वर ऑर्डर दिली असता अत्यंत निकृष्ट वास येणारे वरण देण्यात आले. ते वरण खाल्ल्यावर पोटामध्ये मळमळू लागल्याने आमदारांनी कॅंटिनमध्येच राडा केला. यावेळी त्यांनी कॅंटीन चालकास फैलावर घेतलं. कॅन्टीनमध्ये त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. या मारहाण प्रकरणामुळे संजय गायकवाड यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे.