ठाणे: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेनंतर आता ‘लाडकी सूनबाई अभियान’ सुरू केले आहे. रविवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात मंगळागौर कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदेंनी या नव्या अभियानाची घोषणा केली. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले की, आपल्या घरात जशी लेक लाडकी असते, तशीच सूनसुद्धा लाडकी असायला हवी. तिला योग्य व सन्मानासह वागवले पाहिजे आणि जे असे करणार नाहीत, त्यांना शिवसेना महिला आघाडी योग्य पद्धतीने धडा शिकवेल. 'लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन आहे,' असे शिंदेंनी म्हटले.
शिंदेंनी असेही स्पष्ट केले की, घरगुती हिंसाचारापासून त्रस्त महिलांना मदत मिळेल. 'जो कोणी महिलेला त्रास देईल त्याची गाठ शिवसेनेशी राहील. 'पीडित महिलांना शाखेतून तत्काळ मदत मिळेल,' असे त्यांनी सांगितले. तसेच, 'फोनवर येणाऱ्या तक्रारींवर पहिले समजावून सांगितले जाईल, नंतर शिवसेना स्टाईल लागू होईल,' असेही त्यांनी इशारा दिला. या अभियानाची गरज पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे अधिक जाणवली आहे, जिथे हुंड्यासाठी छळ होऊन तिचे आयुष्य संपले होते. या घटनेमुळे राज्यभरात विवाहित महिलांवर होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाचा प्रश्न चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदेंनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘लाडकी सूनबाई अभियान’ हाती घेतले आहे.
शिंदेंनी कार्यक्रमात सासू-सासऱ्यांबाबतही सांगितले की, सगळेच वाईट नसतात; जे सासरच्यांचे वर्तन चांगले असेल, त्याचा सत्कार देखील केला जाईल. या अभियानातून महिलांना सुरक्षितता, सन्मान आणि घरगुती हिंसाचाराविरुद्ध मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या नव्या अभियानाद्वारे शिवसेना महिला आघाडी राज्यातील विवाहित महिलांसाठी मजबूत संरक्षक ठरणार आहे. लाडक्या सुनेचे रक्षण करणे आणि घरगुती हिंसाचार रोखणे या उद्देशाने हा उपक्रम राबवला जाणार आहे.