सांगली: राज्याच्या राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत असतात. अशातच, सांगलीतून एक मोठी अपडेट समोर आली आहे. सांगलीतील शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयंत पाटलांचे शिलेदार आणि सांगलीचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह, त्यांची दोन्ही मुले चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केले.
अण्णासाहेब डांगे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर, राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली होती की, अण्णासाहेब डांगे भाजप पक्षात प्रवेश करणार. बुधवारी, जयंत पाटलांचे शिलेदार अण्णासाहेब डांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या कारणामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का बसणार आहे असे सांगितले जात आहे. या काळात, सांगलीमध्ये भाजपची ताकद वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: 'भानगड' किल्ल्याची नेमकी भानगड काय? वातावरणात बदल, विचित्र आवाज; संध्याकाळ होताच किल्ला पर्यटकांसाठी बंद
कोण आहेत अण्णासाहेब डांगे?
अण्णासाहेब डांगे हे सांगलीतील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात काम केले आहे. राज्यात पहिल्यांदाच काँग्रेसला सत्तेत येण्यापासून रोखण्यात अण्णासाहेब डांगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासह, विधानपरिषदेत त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले आहे. शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये अण्णासाहेब डांगे ग्रामविकास आणि पाणीपुरवठा मंत्री होते. पक्षातील अंतर्गत वादांमुळे, अण्णासाहेब डांगे यांनी भाजप सोडला आणि स्वतःचा स्वतंत्र राजकीय पक्ष सुरू केला.