छावा संघटनेच्या अध्यक्षांना कोपऱ्यापासून ढोपरापर्यंत मारणाऱ्या सुरज चव्हाण यांचे महिन्याच्या आतच राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. युवक प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी झालेल्या सुरज चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लातूरमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमानिमित्त आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कार्यक्रमात छावा या संघटनेचे पदाधिकारी पोहोचले. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला आणि तटकरे यांच्या समोर पत्ते फेकले. यावेळी चिडलेल्या सुरज चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन विजय घाडगे यांना मारहाण केली. विजय घाडगे यांना कोपऱ्यापासून लाथा-बुक्क्यांपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यानंतर सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई होऊन त्यांची राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबुकपेजवरुन दिली माहिती :
राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबुकपेजवर याबाबत फोटो पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे. तसेच सुरज चव्हाण यांना आगामी कारकीर्दीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. "महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी मा. श्री.सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मा. चव्हाण यांना शुभेच्छा", असं राष्ट्रवादीच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मारहाणीनंतर महिन्याभरात लगेचच पद :
मारहाणीची ही घटना 20 जुलै रोजी घडली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला. मात्र या घटणेला महिनाही उलटत नाही तर सुरज चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे.सुरज चव्हाण यांना नवीन जबाबदारी देण्यात आली असून ते आता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस असतील.