मुंबई: महाराष्ट्रात बऱ्याच दिवसांपासून मराठी -अमराठी वाद पाहायला मिळत आहे. मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे मराठीबद्दल आग्रही असल्याचे पाहायला मिळते. अनेक ठिकाणी मराठी लोकांवर अन्याय झाल्यावर तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे धावून जात असते. अशातच आता मुंबईमध्ये एक परप्रांतीय राज ठाकरेंबद्दल बोलताना शिवीगाळ करताना दिसला. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सुजित दुबे असं या परप्रांतीयाचं नाव आहे. दारू पिऊन तो राज ठाकरेंबद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषेत बरळला आहे. आपण मुंबईच्या अंधेरी पूर्व भागात राहतो असंही तो व्हिडीओमध्ये सांगत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय, पुढील कारवाई सुरू आहे.
परप्रांतीयाकडून राजसह आई, बहिणीला शिवीगाळ
मुंबईतील अंधेरी पूर्वे भागात परप्रांतीय नागरिकांने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. दारुच्या नशेत एका परप्रांतीय नागरिकाकडून मनसेच्या राज ठाकरे यांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्यांच्या आई आणि बहिणीवरही शिवीगाळ झाली. हा शिवीगाळ करणारा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. अंधेरी पूर्व येथे महाकाली रोडवर सुंदर नगर परिसरात राहणारा परप्रांतीय नागरिक सुजित दुबेकडून शिवीगाळ करण्यात आली आहे.
हेही वाचा: Uddhav Thackeray On Modi: 'सिंदूर कुठे गेला...त्याचं कोल्ड्रिंक्स झालं का?'; उद्धव ठाकरेंची मोदींवर सडकून टीका
राज ठाकरेंना शिवीगाळ, मनसे कार्यकर्ते आक्रमक
राज ठाकरेंना शिवीगाळ करणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. यानंतर अंधेरीत मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओची दखल घेत एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. मनसे कार्यकर्त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांनी सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेतली आणि शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीय नागरिकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीयाला अटक
मनसे कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलिसांना भेटून आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यासोबत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीचे तीन अनधिकृत धंद्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली. जर एमआयडीसी पोलिसांनी शिवीगाळ करणाऱ्या आरोपीविरोधात कठोर कारवाई केली नाही, तर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला. त्यानंतर राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या व्हायरल व्हिडीओची दाखल घेत एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीय नागरिकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर सुजित दुबेला अटक करण्यात आली.