Wednesday, August 20, 2025 11:31:12 AM

ठाकरे ब्रँड बाजारात चालत नाही; मुनगंटीवारांचा ठाकरे बंधूंना टोला

काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा रंगत होती. यावर अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अशातच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे बंधूंवर टीकेचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.

ठाकरे ब्रँड बाजारात चालत नाही मुनगंटीवारांचा ठाकरे बंधूंना टोला

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा रंगत होती. यावर अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अशातच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे बंधूंवर टीकेचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. 'ठाकरे ब्रँड जिवंत असला तरी तो बाजारात चालत नाही. बाजारात अनेक बँड असतात, प्रत्येक बँड बाजारात चालतो असे नाही. सध्या हा ब्रँड बाजारात जनतेस पसंत नाही. मतदारांना आवडत नाही', अशा शब्दात मुनगंटीवारांनी ठाकरे बंधूंना निशाणा साधला. मुनगंटीवारांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. 

हेही वाचा: सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी नराधम बापाने विकली स्वतःची मुलगी

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

'उद्धव ठाकरे स्वतःला सामान्य समजत असतील, कारण ते चिंताग्रस्त झाले आहेत. बाकीचे सामान्य नागरिक जे मतदार आहेत ते आमच्यासोबत आहेत. त्यांनी मतदानादरम्यान ईव्हीएम बटण दाबून आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे. राजकारणाचा स्तर इतका खालावला आहे की लोक जादूटोण्याबद्दल बोलतात. जर जादूटोण्याद्वारे इतक्या जागा जिंकल्या असत्या तर आपल्या देशातील गरिबी दूर होऊ शकली असती, देशातील जातीयवाद दूर होऊ शकला असता. जगात जादूटोणा अस्तित्वात नाही. जर जादूटोणा अस्तित्वात असता तर आपल्याला गुलामगिरीत राहावे लागले नसते. ती एक काल्पनिक कथा आहे', असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

पुढे मुनगंटीवारांनी वक्तव्य केलं की, 'मराठीचा मुद्दा घेऊन सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकता नाही. याच सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. काँग्रेसने नाही दिला. 1956 मध्ये कर्नाटक सीमेत मराठी भाषिकांना बळजबरीने घालण्याचं काम काँग्रेसने केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजवण्याचा प्रयत्न झाला. कारवार, निपाणी कर्नाटकला देऊ नका असं देखील सांगितले होते. मात्र नेहरूंनी ऐकले नाही'.

'या राज्यात कुणीही असो त्याने हृदयात मराठीचे प्रेम ठेवूनच पुढे जायचे आहे. तसेच, महाराष्ट्रात मराठी सक्तीची आहेच. यासह, शिक्षण समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सूत्रीवर निर्णय घेण्यात येईल. राज ठाकरे ज्या भाषेचा वापर करतात ती त्यांच्या पक्षाच्या संस्कृतीचा भाग आहे. जसे संस्कार तसे उच्चार असतात', असा टोला मुनगंटीवारांनी राज ठाकरेंना लगावला. 


सम्बन्धित सामग्री