मुंबई: गेल्या काही दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणात वेगळे वारे वाहते आहे. मराठीच्या मुद्द्यासोबतच आणखी एका मुद्यावरुन दोन्ही भावांचं एकमत झालंय. तो मुद्दा म्हणजे जनसुरक्षा कायद्याचा... या कायद्याला विरोध करत राज ठाकरेंनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला आहे, ज्याला तितकच आक्रमक उत्तर फडणविसांनी दिलं आहे.
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अनेकदा भेट दिली. राज ठाकरेंसोबत चर्चा केली. औपचारिक, अनौपचारिक अशा अनेक बैठका झाल्या. यावरुन दादरमध्ये एक कॅफे उघडलंय अशी टीका राऊतांनी केली होती. एकंदरीत राज ठाकरे महायुतीसोबत येतात की काय अशी चर्चाही झाली. त्याची परिणती लोकसभा निवडणुकीत राज यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यात झाली. राज यांनी युतीसाठी सभा घेतल्या. त्याचा फायदा झाल्याचं खुद्द नारायण राणेंनी कबुलही केलं. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे युतीत सहभागी होण्याची दाट शक्यता असतानाच सरकारच्या एका धोरणाने यात मिठाचा खडा टाकला. ते म्हणजे म धोरण.....
त्रिभाषा धोरण जसं सरकारने जाहीर केलं तसं राज ठाकरेंनी सरकारवर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली. पण या धोरणामुळे राज्याच्या राजकारणाला दिशा देणारी आणखी एक बाब घडली. मराठीच्या मुद्द्यावरुन राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. राज यांनी बोलताना याचं श्रेय चक्क फडणविसांना दिलंय.
हेही वाचा: रक्षाबंधनाच्या दिवशी गोड बातमी!, फडणवीस सरकारची लाडक्या बहिणींना ओवाळणी
इतकच काय तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर देखील गेले, आणि आता उद्धव ठाकरे गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत. ठाकरे बंधुंच्या वाढत्या जवळीकीसोबतच राज ठाकरे आणि फडणविसांमधलं अंतर मात्र वाढत चाललंय. राज ठाकरेंसमोर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख अनाजी पंत असा केला. मराठीच्या मुद्दयावरुन ठाकरे बंधुंनी सरकारवर प्रहार केला. त्यानंतर हे धोरण सरकारला रद्द करावं लागलं. आता राज ठाकरेंनी सरकारच्या जनसुरक्षा कायद्यावरही टीका करत फडणवीसांच्या हेतुबद्दलच शंका उपस्थित केली आहे. तसचं फडणवीसांचं नाव घेत त्यांना हिंदी आणायचीये असा थेट आरोप केला. इतके दिवस राज ठाकरेंबाबत मौन असलेल्या फडणवीसांनीही राज ठाकरेंच्या अंगावर जाण्याची भाषा केली आहे.
इतके दिवस राज ठाकरेंची टीका शांतपणे सहन करत मागच्या दाराने भाजपची बोलणी सुरु असल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजप नेते राज ठाकरेंबद्दल सौम्य भूमिका घेत होते. पण आता इतके दिवस सौहार्द, समन्वय, सोबतीची भाषा करणारे राज ठाकरे आणि फडणवीस आता एकमेकांना आव्हान देता आहेत. त्यामुळे राज ठाकरे, फडणवीसांमधलं अंतर किती वाढतं आणि ठाकरे बंधुंमधली जवळीक वेगळा राजकीय पर्याय निर्माण करते का हे बघावं लागेल.