कोल्हापूर: 29 जुलै रोजी शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील अंबानींच्या 'वनतारा' येथे पाठवण्यात आले. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले की, 'माधुरीचा सुरू असलेला वाद आता संपला'. यासह, राजू शेट्टींनी अशी प्रतिक्रिया दिली की, 'गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरीसाठी एक विशेष केंद्र उभारून तिच्यावर उपचार करण्यात येणार आहेत'. या दरम्यान, राजू शेट्टींनी अनंत अंबानींचे कौतुकही केल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, 'वाद मिटवण्यासाठी अनंत अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे'.
नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणी, जिचे गेल्या 35 वर्षांपासून ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचे नाते आहे, तिला काही दिवसांपूर्वी गुजरातमधील अंबानींच्या 'वनतारा' येथे पाठवण्यात आले होते. या घटनेमुळे, संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. तसेच, परंपरेला धक्का बसल्याने जैन समाज आणि कोल्हापूरकर उदास आहेत. स्थानिक लोकांचा असा दावा होता की, 'माधुरी हत्तीणीला वनतारात योग्य उपचार मिळणार नाहीत. तिला कोल्हापूरमधून हलवू नये'. तसेच, माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्याकडून स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली होती. माहितीनुसार, महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सव्वा दोन लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. यासह, कोल्हापुरकरांनी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात 3 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजल्यापासून नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेष पदयात्रा काढली होती.
हेही वाचा: चाकणकरांनी खडसेंच्या जावयावर केलेल्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं उत्तर; म्हणाल्या, 'सगळी जबाबदारी...'
वनतारा प्रशासन काय म्हणाले?
'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच माधुरी आमच्या ताब्यात आली आहे. मात्र, कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेता आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत', अशी प्रतिक्रिया वनताराच्या प्रशासनाने दिली. वनताराचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, 'कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महादेवी उर्फ माधुरी हत्तीणला परत केले जाईल'. यासह, वनतारा प्रशासनाने नांदणी जैन मठाला आश्वासन दिले आहे की, 'माधुरी हत्तीणीला वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नांदणी मठाच्या परिसरातच एक सेंटर उभे केले जाईल'.