मुंबई - विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरु झालेलं आहे.अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी बऱ्याच घडामोडी घडल्या. अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधी पक्षाने शपथ घेण्यास असमर्थन दाखवून सगळ्या नजरा आपल्या दिशेने वळवल्या. पण दुसऱ्या दिवशी मात्र सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आणि विरोधकांना उत्तरे दिली. ह्या सर्व प्रक्रियेत कोणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तर कोणी सामाजिक माध्यमांचा वापर करून स्वतःला व्यक्त केलं. पण, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पाडळकरांनी जे केलं त्या गोष्टीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
आज म्हणजे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन केले. दोघांनी घोषणादेखील दिल्या. महाविकास आघाडीचा धिक्कार असो आणि नवीन तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या शरद पवारांचा धिक्कार असो अश्या घोषणा ह्या दोन्ही दिग्गज नेत्यांकडून करण्यात आल्या.
ह्या आंदोलनांनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाददेखील साधला. संवाद साधताना सदाभाऊ खोत म्हणले की 'नाना पटोले हे मान्यता नसलेल्या शाळेत पास झालेले आहेत. काँग्रेसच्या काळात ईव्हीएमनेच मतदान होत होतं लोकसभेला सुद्धा ईव्हीएम मधूनच काँग्रेसला मतदान झालं. शरद पवार गटाला 58 लाख मतदान लोकसभेत झालं आता या सगळ्याचा हिशोब नाना पटोले यांनी आम्हाला सांगावा.बहुतेक पवार साहेबांच्या शाळेत नाना पाटोले यांचं शिक्षण झालं असावं'.
सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचा ह्या आंदोलनचं प्रतिउत्तर विरोधक काय देतील ह्या गोष्टीवर महाराष्ट्राच्या जनतेचं आणि त्याच बरोबर महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांचं लक्ष नक्कीच असेल.