शुभम उमाळे. प्रतिनिधी. मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवासातील कँटीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. निकृष्ट जेवण दिल्यामुळे गायकवाडांनी कँटीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. ही घटना आकाशवाणी आमदार निवासातील असून, हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: अविनाश जाधवांच्या अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न
नेमकं प्रकरण काय?
पावसाळी अधिवेशनासाठी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड मुंबईत आहेत. यादरम्यान, गायकवाड आकाशवाणी आमदार निवासात मुक्काम करत होते. यादरम्यान, मंत्रालयासमोर असलेल्या कॅन्टीनला आमदार संजय गायकवाड यांनी रूम नंबर 107 वरून जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, त्यांना अत्यंत निकृष्ट आणि वास येणारी डाळ देण्यात आली. ती डाळ खाल्ल्यानंतर गायकवाड यांना त्रास होऊ लागल्याने, त्यांनी कॅन्टीनमध्ये येऊन राडा केला. इतकच नाही, तर संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला थेट बुक्क्यांनी मारहाण केली. मंगळवारी रात्री गायकवाड यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचा आरोप करत त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली. यादरम्यान, त्यांनी कँटीन चालकालाही लक्ष्य केले. यासंदर्भात, निकृष्ट जेवणाचा मुद्दा आमदार संजय गायकवाड विधानसभेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.