समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबच्या स्तुतीपर वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विधानसभेतही त्याचे तीव्र पडसाद उमटले. भाजप-शिवसेना नेत्यांनी अबू आझमी यांच्यावर टीका करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. अखेर संपूर्ण अधिवेशन काळासाठी त्यांचे निलंबन करण्यात आले.
हा मुद्दा आता उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अबू आझमी यांच्या विधानांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी समाजवादी पक्षाला थेट इशारा देत म्हटले, “अशा व्यक्तींना पक्षातून काढून टाका किंवा त्यांना उत्तर प्रदेशात पाठवा. येथे अशा लोकांवर योग्य ती कारवाई केली जाते.”
‘देशात राहण्याचा अधिकार नाही’ – योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “समाजवादी पक्षाने अशा लोकांना आदर्श मानले आहे, ज्यांनी कधी काळी जनतेवर जिझिया कर लावला होता. अशा व्यक्तींची पक्षातून हकालपट्टी व्हायला हवी. अबू आझमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव करण्याऐवजी औरंगजेबचे गुणगान केले आहे. अशी व्यक्ती आमच्या देशात राहण्यास पात्र आहे का? समाजवादी पक्षाने याचे उत्तर द्यावे.”
ते पुढे म्हणाले, “एकीकडे तुम्ही महाकुंभावर टीका करता आणि दुसरीकडे औरंगजेबचे कौतुक करता. औरंगजेबने देशातील मंदिरे उद्ध्वस्त केली. तरीही तुम्ही त्या आमदारावर कारवाई करत नाही, त्याच्या विधानांचा निषेध करत नाही?” असा सवालही त्यांनी केला.
योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर टीका करताना म्हटले, 'समाजवादी पक्ष आता डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या तत्त्वांपासून दूर गेला आहे. त्यांनी औरंगजेबाला आपला आदर्श मानला आहे. तुम्ही जाऊन शहाजहानचे चरित्र वाचा. औरंगजेब हा भारताच्या श्रद्धेवर आघात करण्यासाठी आला होता. तो देशाचे इस्लामीकरण करू पाहत होता. म्हणूनच कोणताही सुसंस्कृत माणूस आपल्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही.'