मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे.विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर दहा दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत दिले आहेत.दरम्यान उद्या 15 डिसेंबर रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 4 वाजता शपथविधी होईल, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री नव्या मंत्रिमंडळात सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.
शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी राजभवनात जय्यत तयारी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात बैठक घेतली. या बैठकीत जवळपास पाऊण तास चर्चा झाली. या चर्चेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखांबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांवर विशेष चर्चा झाली असून, शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी जवळपास निश्चित झाली आहे. या यादीतील नावांची लवकरच घोषणा केली जाणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमधीलही संभाव्य मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली असून, पक्षांतर्गत बैठकांमधून अंतिम निर्णय घेतले जात आहेत.
राजकीय समीकरणांचा विचार करता, मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील पक्षांतर केलेल्या आमदारांना स्थान देण्यावर भर दिला जाणार असल्याचे दिसते. या विस्तारामुळे राज्यातील राजकीय गणितांना नवे वळण मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.