मुंबई: मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता मीरा भाईंदरमधील व्यापरी तसेच व्यापारी संघटनांनी मनसेविरोधात मोर्चा काढला आहे. तसेच मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. तर हा मोर्चा भाजपा पुरस्कृत आहे, असा दावा मनसेने केला आहे.
नेमकं काय घडलं?
साधारण साडे दहा वाजता मनसे पक्षाचे सहा ते सात जण दुकानात आले. कॅश काऊंटरजवळ येऊन त्यांनी पाण्याची बॉटल मागितली. पाण्याची बॉटल दहा रुपयांची हवी आहे की 20 रुपयांची हवी आहे, असं कॅश काऊंटरजवळच्या कर्मचाऱ्याने विचारलं. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते म्हणाले की हिंदी नव्हे तर मराठीत बोल. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलावं लागेल, असं हे कार्यकर्ते म्हणाले. तसेच त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना शिव्या दिल्या. दुकान फोडून टाकण्याचीही त्यांनी धमकी दिली.
हेही वाचा : दिशा सालियान प्रकरणावर काय म्हणाले महायुतीचे नेते?
दरम्यान, आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या मारहाणीनंतर मीरा भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात मोर्चा काढला आहे. व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. तर हा मोर्चा भाजपा पुरस्कृत आहे, असा दावा मनसेने केला आहे.
नेमकं कोण चिथावतंय?
भाजप हिंदी भाषिकांच्या बाजूनं असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. हिंदूंना मारहाण केली, तर भाजपा सोडणार नाही असेही राणे म्हणाले. मराठीच्या मुद्यावर मनसेसोबत ठाकरे गटही आहे. दोन्ही ठाकरेंच्या एकत्रीकरणामुळे आक्रमकता वाढली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बंद, हिसेंमागे भाजप असल्याचा संशय काँग्रेसनं व्यक्त केला आहे.
मीरा रोड मारहाण प्रकरणावर मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडेल अशी संतप्त प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानिमित्त मीरा रोडमध्ये जल्लोष मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी एका दुकानदाराने मराठी विषयी वादग्रस्त विधान केलं. याविरोधात मीरा रोडमध्ये मनसे आक्रमक झाली.