मुंबई: राष्ट्रवादीचे मंत्री एकामागोमाग एक असे सलग वाद ओढवून घेत आहेत. माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलंय. कोकाटेंच्या विरोधात विरोधकांनी जो आक्रमक पवित्रा घेतला होता, तो पाहता कोकाटेंवर काहीतरी कारवाई करावीच लागणार होती. पण या कारवाईची राजकीय किंमत मोजायला लागू नये, अशी इच्छा अजित पवार आणि महायुतीचीही होती. कोकाटेंचं खातं बदलून अजित पवारांनी ही इच्छा तर पूर्ण केली. पण एकाच दगडात तीन पक्षी मारले. कोकाटेंवरील कारवाईच्या निमित्ताने दादांनी काय काय साधलं.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनातील सगळ्यात जास्त वादात सापडलेला रमीचा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ एव्हाना अवघ्या महाराष्ट्राला माहित झालाय. हा व्हिडीओ राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटेंचा होता. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना कोकाटे आपल्या मोबाईलवर रमीचा डाव मांडून बसले होते. कोकाटेंच्या या व्हिडिओवर विरोधकांनी रान उठवलं आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही कोकाटेंचे कान टोचले. अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही मात्र त्यांचे खातं बदललं. माणिकराव कोकाटेंचं कृषीखातं दत्ता भरणेंना दिलं आणि दत्ता भरणेंचं क्रीडा खातं माणिकरावांना दिलं. दादांनी या खेळीने एकाच दगडात तीन पक्षी मारले.
हेही वाचा: राज ठाकरेंची भावासोबत जवळीक, फडणवीसांसोबत दुरावा
कसे ते बघा?
दत्ता भरणेंची नाराजी दूर
दत्ता भरणे हे राष्ट्रवादीच्या वरच्या फळीतले नेते आहेत. अजित पवारांच्या जवळचे नेते अशी त्यांची ओळख आहे. मविआ आणि महायुती सरकारमध्येही ते मंत्री आहेत. सध्याच्या सरकारमध्ये क्रीडा खातं मिळाल्याने ते नाराज होते. खातेबदलात दत्ता भरणेंना कृषीखातं देऊन अजित पवारांनी त्यांची नाराजी दूर केली.
भुजबळांना बळं देणं टाळलं
सरकारस्थापनेवेळी मंत्रीपद न दिल्याने भुजबळ नाराज होते. कोकाटेंची भुजबळांच्या विरोधात जाहीर भूमिका होती. कोकाटेंचं मंत्रीपद जाणं म्हणजे नाशकात भुजबळांना बळ मिळणं. मात्र कोकाटेंचं मंत्रीपद कायम ठेवून नाशकातला बॅलन्स साधला.
हेही वाचा: रक्षाबंधनाच्या दिवशी गोड बातमी!, फडणवीस सरकारची लाडक्या बहिणींना ओवाळणी
पक्षाची नामुष्की टाळली
तीन महिन्यांच्या आतच राष्ट्रवादीचा एक राजीनामा झाला. लगेचच दुसरा राजीनामा झाला असता तर अडचण झाली असती. महायुतीत पक्षाची ताकद कमी होण्याचा धोका होता.
अजित पवारांच्या या तिहेरी खेळीनं फक्त राष्ट्रवादीच नाही तर संपूर्ण महायुतीचाच फायदा झाला. कारण कोकाटेंचा राजीनामा घेतला असता तर शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठीही दबाव वाढला असता. शिवाय वाद उद्भवला की मंत्र्यांचा राजीनामा होतो असाही पायंडा पडला असता. अजित पवारांच्या या खेळीने हे सगळंच टळलं.