Wednesday, August 20, 2025 09:15:58 AM

दोन्ही भाऊ महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार का?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. तब्बल वीस वर्षांनंतर दोन्ही भाऊ एका मंचावर येऊ लागलेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला हा बदल निश्चित मानला जात आहे.

दोन्ही भाऊ महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार का

मुंबई: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. तब्बल वीस वर्षांनंतर दोन्ही भाऊ एका मंचावर येऊ लागलेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला हा बदल निश्चित मानला जात आहे. वीस वर्षांनी आम्ही एकत्र येऊ शकतो. मग तुम्ही आपली भांडणं संपवू शकत नाही? मेळाव्यात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सवाल केला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.

राज ठाकरेंच्या वक्तव्याला मनसे नेत्यांनी दुजोरा दिला आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटात समाधान पाहायला मिळत आहे. पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येणार? राज मविआत सहभागी की फक्त ठाकरेंसोबत? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण हा बदल नेमका कोणत्या पातळीवर असेल. दोन्ही भावांचं एकत्र येणं हे फक्त कौटूंबिक असेल, सामाजिक असेल की राजकीय असेल? राजकीय असेल तर नेमकं कसं.. 

हेही वाचा: अंजली दमानियांविरोधात वॉरंट जारी; नेमकं प्रकरण काय?

उद्धव ठाकरे बोलत असताना राज ठाकरे मात्र युतीबाबत काही बोलत नाहीत. भाजपचे नेते उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना राज ठाकरे काही बोलत नाही. निशिकांत दुबेंच्या मुद्द्यावर मनसे संतप्त असताना उद्धव मात्र शांत आहेत. या सगळ्या वातावरणात आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं एक शिबिर पार पडलं.त्यात राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यानंतर मात्र राज ठाकरेही युतीसाठी अनुकूल असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. या शिबिरात वीस वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही आपापसात का भांडता? असा सवाल त्यांनी पदाधिकाऱ्यांना केला आहे. 

मुंबईत झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी वक्तव्य केलं आणि राज-उद्धव युतीबाबत गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची चिन्ह दिसू लागली. गेल्या काही दिवसात राज आणि उद्धव हे एकत्र तर दिसत होते. पण राज ठाकरे दोघांच्या एकत्र येण्याबाबत काहीही स्पष्ट बोलत नव्हते. आजही आपण हे वक्तव्य करताना कोणताही कॅमेरासमोर नसेल याची काळजी राज यांनी घेतली पण बाळा नांदगावकरांनी राज यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला. पहिलीपासून हिंदीची सक्ती या मुद्द्याविरोधात राज आणि उद्धव यांनी भूमिका मांडली. याच मुद्द्यावर सरकारने अध्यादेश मागे घेतला आणि दोन्ही पक्षांनी विजय साजरा केला. 

हेही वाचा: धक्कादायक! 27 वर्षीय महिलेचा बळजबरीनं गर्भपात; पतीपासून विभक्त महिलेची लग्नाचे आमिष देत जुन्या मित्राकडून फसवणूक

तब्बल वीस वर्षांनी दोन्ही भाऊ पहिल्यांदा एकत्र आले. दोघांनी भाषणंही केली. उद्धव ठाकरेंनी दोघांच्या एकत्र येण्याचा वारंवार उल्लेख केला.पण राज काही बोलले नाहीत. नंतर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. पण एकत्र येण्याबद्दल ठोस वक्तव्य केलं नाही. मनसेच्या मेळाव्यात मात्र राज यांच्या वक्तव्यामुळे पदाधिकाऱ्यांना पुढची दिशा स्पष्ट झाली. 

राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याचे स्पष्ट संदेश दिसत आहे. इतर कुणाहीपेक्षा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मिळणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळेच कदाचित याबाबत जाहीर वक्तव्य करण्याऐवजी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर हे वक्तव्य केलं असावं. काँग्रेसच्या खासदारांनी निशिकांत दुबेंना घेरणं, निशिकांत दुबेंचं महाराष्ट्रात आल्यास स्वागत करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं. राज ठाकरेंनी दोन भावांच्या एकत्र येण्याबाबत कार्यकर्त्यांसमोर बोलणं आणि उद्धव ठाकरेंनी तीन दिवसांचा दिल्ली दौरा आखणं. गेल्या आठवड्याभरात एकामागोमाग एक घडलेल्या या घटना योगायोग नक्कीच नसाव्यात. 

 


सम्बन्धित सामग्री