मुंबई: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोकाटेंचा रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला आणि रान पेटलं. रमीच्या व्हायरल व्हिडीओनंतर विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यात आल्या. त्याच्याकडील कृषीमंत्री पदाचा राजीनामा देखील मागण्यात आला. त्यावरुन सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही घेरण्यात आले. अखेर गुरुवारी कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले. त्यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली. यानंतर आता तरी धड काम करा असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना दिला आहे.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना सल्ला दिला. एक्स पोस्ट करत त्यांनी हा सल्ला दिला. कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते. पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्याचा फटका बसतो. तसंच काहीसं माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत झालं. सरकारने कोकाटेंच्या राजीनाम्याऐवजी त्यांना क्रीडा खातं दिलंय. क्रीडा खाते देखील युवांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या खात्यात काम करताना भूतकाळातील चुका त्यांनी टाळाव्या. अनुभवाचा योग्य वापर करून क्रीडा क्षेत्राला न्याय द्यावा अशा आशयाची पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
हेही वाचा: आव्हाड आणि वंचित यांच्यातील वाद विकोपाला; वंचितच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून आव्हाडांना शिवीगाळ
दरम्यान याआधीही माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला असे त्यांनी म्हटले आहे. मात्र माणिकराव कोकाटे चांगला कार्यकर्ता आहे असे म्हणत राधाकृष्ण विखे - पाटील यांनी कोकाटेंची पाठराखण केली आहे. कोकाटे यांचे मंत्रीपद बदलवण्याचा सर्वस्वी निर्णय हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे. त्यांचं कृषी खात काढून त्यांना क्रीडा खातं देण्यात आलेला आहे असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.