Raksha Bandhan 2025: आज देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे हे अद्वितीय प्रतीक असलेला हा रक्षाबंधनाचा सण पिढ्यानपिढ्या मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. आज पहाटे 5:35 ते दुपारी 1:24 या वेळेत राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त होता.
राखी हा केवळ एक धागा नसून तो भावनिक नात्याचा पवित्र धागा आहे. त्यामुळे त्याचा अनादर करणे धार्मिकदृष्ट्या अयोग्य मानले जाते. अनेकदा काही जण राखी बांधल्यानंतर थोड्याच वेळात ती काढून टाकतात, परंतु हे टाळावे. श्रद्धेनुसार, असे केल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि पाप लागू शकते.
राखी कधी काढावी?
शास्त्रांमध्ये राखी काढण्याची ठराविक वेळ दिलेली नसली तरी धार्मिक तज्ज्ञांचे मत आहे की, राखी किमान 24 तास बांधून ठेवावी. 24 तासांनंतर, शुभ मुहूर्त पाहून ती काढणे योग्य ठरते. तथापी, राखी बांधल्यानंतर काही वेळातचं ती काढून टाकणे अशुभ मानले जाते.
हेही वाचा - Shravan Puja on Rakhi : आधी करा श्रावण पूजा, मगच बांधा राखी; काय आहे ही प्रथा, जाणून घ्या श्रावण पूजेचं महत्त्व
राखी काढण्याच्या परंपरा -
अनेक भागांत कृष्ण जन्माष्टमी किंवा दसऱ्याच्या दिवशी राखी काढण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी पंधरवडाभर राखी ठेवण्याची परंपरा आहे. तर काही भावंडे ती संपूर्ण वर्षभरही ठेवतात. काही जण ब्रह्म मुहूर्तावर जुनी राखी काढून शुभ वेळेत नवीन राखी बांधतात. मात्र, शास्त्रानुसार दीर्घकाळ राखी बांधून ठेवणे गरजेचे नाही.
हेही वाचा - Narali Purnima 2025 : नारळी पौर्णिमेची पूजा कशी केली जाते? जाणून घ्या, या दिवसाचे महत्त्व
राखी काढल्यानंतर काय करावे?
राखी काढल्यानंतर ती घरात दीर्घकाळ ठेवू नये. ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी किंवा एका रुपयाच्या नाण्यासह झाडाला बांधावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते. जर राखी तुटली तर ती तुळशीच्या रोपात ठेवणे शुभ मानले जाते. ज्यांना राखी आठवण म्हणून ठेवायची आहे, त्यांनी ती लाल कापडात बांधून मंदिरात किंवा बहिणीच्या वस्तूंसोबत सुरक्षित ठेवावी. यामुळे त्या पवित्र बंधाची आठवण आणि सकारात्मक ऊर्जा दीर्घकाळ जपली जाते.
रक्षाबंधनाचा खरा अर्थ फक्त धागा बांधणे नाही, तर एकमेकांबद्दलची कृतज्ञता, विश्वास आणि प्रेम जपणे आहे. म्हणूनच राखी बांधणे, ठेवणे आणि काढणे या सर्व कृती शास्त्र आणि परंपरेनुसार केल्यास नात्याचा पवित्र धागा अधिक दृढ होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही)