Janmashtami 2025: श्रावण महिन्याच्या सणांची सुरुवात रक्षाबंधनपासून होते आणि लगेचच भक्तिभावात रंगून टाकणारा सण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. आपल्या लाडक्या श्रीकृष्णाच्या जन्माची प्रतीक्षा करणाऱ्या भक्तांसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो. मंदिरांपासून घराघरांपर्यंत श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोपाळकाला, दहीहंडी, रात्री श्रीकृष्ण जन्माचा मुहूर्त, पूजाविधी यामुळे या सणाचं वैशिष्ट्य आणखी खुलून येतं. मात्र यंदा जन्माष्टमीची तारीख नेमकी कधी आहे, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे.
हिंदू पंचांगानुसार जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. याच दिवशी भगवान विष्णूंच्या आठव्या अवतार श्रीकृष्णाचा मथुरा नगरीत मध्यरात्री जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमी प्रामुख्याने रात्रीच्या काळात साजरी केली जाते.
2025 साली अष्टमी तिथीचा प्रारंभ 15 ऑगस्ट रोजी रात्री 11.49 वाजता होणार आहे आणि ती समाप्त होईल 16 ऑगस्ट रोजी रात्री 9.34 वाजता. यानुसार, उदय तिथी म्हणजे जी तिथी सूर्योदयाच्या वेळी अस्तित्वात असते; ती 16 ऑगस्टला असल्यामुळे यंदाची जन्माष्टमी 16 ऑगस्ट 2025, शनिवार या दिवशी साजरी केली जाणार आहे.
या दिवशी भक्तगण उपवास करत भगवान श्रीकृष्णाच्या जन्मासाठी रात्रीपर्यंत पूजा-अर्चा करतात. घरांमध्ये बालकृष्णाच्या मूर्तीची विशेष पूजा केली जाते. विविध भोग अर्पण करून, झोपाळ्यावर बसवून श्रीकृष्णाचा झुला झुलवतात. अनेक ठिकाणी नामस्मरण, भजन-कीर्तन, प्रवचन व कृष्णलीला सादर केली जाते. दहीहंडी उत्सवाचे आयोजनही ठिकठिकाणी केले जाते. गोविंदा पथके तयार होऊन दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुक असतात.
जन्माष्टमी ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ती भक्ती, प्रेम, आणि श्रीकृष्णाच्या लीलांनी भरलेला दिव्य उत्सव आहे. त्यामुळे यंदाही श्रीकृष्णाच्या भक्तांनी 16 ऑगस्टला संपूर्ण श्रद्धेने आणि आनंदात जन्माष्टमी साजरी करावी, अशी भाविकांची भावना आहे.