Krishna Janmashtami 2025: भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. इतर बहुतेक सण सकाळी किंवा दिवसा सुरू होतात, परंतु जन्माष्टमीचा सण मध्यरात्री साजरा केला जातो. यामागे केवळ परंपरा नाही तर पौराणिक कथा, अध्यात्म आणि ज्योतिषीय महत्त्व देखील दडलेले आहे. भागवत पुराणानुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यरात्री झाला. त्यांचा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला, जिथे त्यांचे पालक देवकी आणि वासुदेव यांना अत्याचारी राजा कंसाने कैद केले होते.
कंसाला देवकीचा आठवा मुलगा त्याचा संहार करेल, अशी भविष्यवाणी सांगण्यात आली होती. त्यानंतर त्याने देवकीचे सातही अपत्य जन्मताच ठार मारले. मात्र आठव्या अपत्याच्या जन्माच्या रात्री, दैवी हस्तक्षेप झाला. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले, पहारेकरी झोपले असताना वासुदेवांनी बालकृष्णाला टोपलीत ठेवून यमुना नदी पार केली. त्यानंतर त्यांनी गोकुळात बालकृष्णाला नंद-यशोदा यांच्या स्वाधीन केले. हा क्षण अंधारात प्रकाशाचा जन्म, म्हणजेच अधर्मावर धर्माचा विजय याचे प्रतीक मानला जातो.
आध्यात्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व -
मध्यरात्र हा दिवसातील सर्वात शांत आणि आध्यात्मिक उर्जेने परिपूर्ण काळ मानला जातो. योग तत्त्वज्ञानानुसार, हा ब्रह्म मुहूर्तासारखा काळ असतो. यावेळी मन एकाग्र होऊन ध्यान आणि भजनासाठी योग्य असते. भक्तांच्या मते, या क्षणी श्रीकृष्णाचे स्मरण केल्याने आणि नामस्मरण केल्याने आध्यात्मिक शक्ती वाढते आणि मनशांती प्राप्त होते.
हेही वाचा - Shravan 2025: श्रावणामध्ये 'या' चुका अजिबात करु नका; मोठे नुकसान होईल
श्रीकृष्णजन्माष्ठमी साजरा करण्याची परंपरा -
जन्माष्टमीच्या दिवशी भारतभरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये आणि इस्कॉन केंद्रांमध्ये मुख्य पूजा मध्यरात्री केली जाते. यादरम्यान, बालकृष्णाचा अभिषेक केला जातो, त्यांना रेशमी वस्त्र परिधान करून सोन्या-चांदीच्या झुल्यात बसवले जाते. मंदिरांमध्ये भजन-कीर्तनाचा गजर सुरू असतो. भक्त दिवसभराचा उपवास मध्यरात्रीनंतर सोडतात.
हेही वाचा - Janmashtami 2025 Date: यंदा जन्माष्टमी 15 की 16 ऑगस्टला? जाणून घ्या नेमकी तारीख आणि शुभमुहूर्त
श्रीकृष्ण जन्माष्टमी शनिवारी म्हणजेच 16 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. चंद्र कालगणनेनुसार, अष्टमी तिथी 15 आणि 16 ऑगस्ट दोन्ही दिवशी येत असल्याने काही भक्त 15 तारखेलाही उपवास करतील. तरी, बहुतेक ठिकाणी मुख्य उत्सव 16 ऑगस्टच्या रात्री पार पडेल. जन्माष्टमी हा केवळ सण नसून श्रद्धा, प्रेम आणि भक्तीचा जिवंत अनुभव आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)