Thursday, August 21, 2025 02:52:31 AM

PAK vs NZ: घरच्या मैदानावर पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी!

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने यजमान पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला.

pak vs nz घरच्या मैदानावर पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव न्यूझीलंडची विजयी सलामी
PAK vs NZ: घरच्या मैदानावर पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी!

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने यजमान पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला. कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडच्या टॉम लॅथम (११८) आणि विल यंग (१०७) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर किवी संघाने ३२० धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ २६० धावांत आटोपला.

 

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला कर्णधार रिजवानचा हा निर्णय योग्य ठरला. कारण न्यूझीलंडने ७३ धावांमध्येच ३ गडी गमावले होते. डेव्हॉन कॉन्वे (१०), केन विल्यमसन (१) आणि डॅरिल मिशेल (२५) झटपट बाद झाले. त्यानंतर विल यंग आणि टॉम लॅथम यांनी डाव सावरत चौथ्या गड्यासाठी दमदार शतकी भागीदारी केली.

 

हेही वाचा - ICC ODI Ranking: गिल नंबर १, बाबर आझमला धक्का, ४ भारतीय खेळाडू टॉप-१० मध्ये

विल यंगने ११३ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारासह १०७ धावा फटकावल्या. त्याला टॉम लॅथमने अप्रतिम साथ दिली. लॅथमने १०४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ११८ धावा केल्या. याशिवाय ग्लेन फिलिप्सने ३९ चेंडूत ६१ धावा करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. न्यूझीलंडने अखेरच्या षटकांत तुफानी फटकेबाजी करत ५० षटकांत ५ बाद ३२० धावा केल्या. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

 

हेही वाचा - भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर पहिल्यांदाच खेळणार काउंटी क्रिकेट

न्यूझीलंडने दिलेल्या ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. फखर जमान नियमाप्रमाणे २० मिनिटांपर्यंत फलंदाजीला येऊ शकत नव्हता. त्यामुळे बाबर आझम आणि सौद शकीलला सलामीला उतरावे लागले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच अंकुश ठेवला. सौद शकील लवकर बाद झाला, तर बाबरने ९० चेंडूत ६४ धावा केल्या, पण त्याने बरेच डॉट बॉल खेळल्याने संघावर दडपण आले.

कर्णधार मोहम्मद रिझवान केवळ ३ धावा करून बाद झाला. त्यानंतर फखर जमान (२४) आणि सलमान आगा (४२) यांनी झटपट खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानची विजयाची आशा खुशदिल शाहने पल्लवित केली. त्याने ४९ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. पण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेल देऊन बाद झाला.

शेवटच्या फळीत शाहीन आफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांनी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवू देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हॅरिस रौफने ३ षटकार ठोकले, पण या छोट्या खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. अखेरीस पाकिस्तानचा संपूर्ण संघ २६० धावांवर गडगडला आणि न्यूझीलंडने ६० धावांनी विजय मिळवला.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कराची नॅशनल स्टेडियममध्ये हजारो चाहते मोठ्या उत्साहाने सामना पाहण्यासाठी आले होते. पण पाकिस्तानच्या खेळाडूंच्या सुमार कामगिरीमुळे चाहते निराश झाले.  


सम्बन्धित सामग्री