Wednesday, August 20, 2025 10:46:21 PM

Ind vs Ban : Live सामन्यात रोहित शर्माची चूक, अक्षर पटेलची हात जोडून मागितली माफी

अक्षर पटेलने आपल्या शानदार गोलंदाजीने बांगलादेशी फलंदाजावर हुकूमत गाजवली. पण त्याची ऐतिहासिक हॅट्ट्रिक एका चुकीमुळे हुकली आणि ही चूक खुद्द कर्णधार रोहित शर्माच्या हातून घडली.

ind vs ban  live सामन्यात रोहित शर्माची चूक अक्षर पटेलची हात जोडून मागितली माफी

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा सामना रंगला आहे. बांगलादेशच्या कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच बांगलादेशवर वर्चस्व गाजवले. यात खासकरून अक्षर पटेलने आपल्या शानदार गोलंदाजीने बांगलादेशी फलंदाजावर हुकूमत गाजवली. पण त्याची ऐतिहासिक हॅट्ट्रिक एका चुकीमुळे हुकली आणि ही चूक खुद्द कर्णधार रोहित शर्माच्या हातून घडली. 

बांगलादेशच्या डावातील ९ वे षटक अक्षर पटेल टाकत होता. त्याने दुसऱ्या चेंडूवर तन्जिद हसनला बाद केले आणि लगेचच तिसऱ्या चेंडूवर त्याने अनुभवी फलंदाज मुश्फिकुर रहिमला देखील पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चौथ्या चेंडूवर त्याच्याकडे हॅट्ट्रिक करण्याची सुवर्णसंधी होती. अक्षरने अचूक टाकलेला फलंदाजाला कळला नाही आणि चेंडू बाहेर वळला आणि बॅटची कडा घेत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला. 

हेही वाचा - भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराहची उणीव भासेल का ?

रोहितसाठी तसे हा झेल पकडणे खूप सोपे होते. पण अनपेक्षितपणे रोहितकडून हा झेल सुटला. त्यामुळे अक्षरची ऐतिहासिक हॅट्ट्रिक हुकली. हा झेल सुटल्याने रोहित स्वतःवर नाराज झाला आणि मैदानावरच निराशा व्यक्त करत स्वतःचे हात आपटले. झेल सुटल्यामुळे रोहित शर्माला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने अक्षर पटेलकडे पाहून हात जोडत माफी मागितली. अक्षरनेही मोठ्या मनाने हसत या गोष्टीकडे पाहिले. या क्षणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

हेही वाचा - PAK vs NZ: घरच्या मैदानावर पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी!

दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत बांगलादेशला अडचणीत टाकले होते. मोहम्मद शमी आणि युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांनी प्रारंभीच बांगलादेशच्या फलंदाजांना धक्के दिले. शमीने दोन, हर्षितने एक, तर अक्षर पटेलने दोन बळी घेत बांगलादेशचा निम्मा संघ स्वस्तात बाद केला. पण त्यानंतर सहाव्या गड्यासाठी तौहीद ह्रदोय आणि जाकिर अली या जोडीने दमदार भागिदारी करत बांगलादेशला परत सामन्यात आणले आहे. 


 


सम्बन्धित सामग्री