सलामीवीर शुभमन गिलचे शतक (112), विराट कोहलीचे अर्धशतक (52), श्रेयस अय्यरची 72 धावांनी तुफानी खेळी आणि गोलंदाजीतील शिस्तबद्ध मारा याच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या अखेरचा वनडे सामना 142 धावांनी जिंकला. गोलंदाजीत अर्शदीप, हर्षित, अक्षर आणि हार्दिक यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद करत इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले. या विजयासह टीम इंडियाने वनडे मालिकेत 3-0 ने निर्भेळ यश मिळवले. शुबमन गिल सामनावीरसह मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी हा मालिका विजय मनोबलाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावली. तेव्हा इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा (1) स्वस्तात बाद झाला. त्याला मार्क वूडने फिल सॉल्टकरवी झेलबाद केले. यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी केली. दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. आदिल रशिदने 19 व्या षटकात ही जोडी फोडली. त्याने विराटला सॉल्टकडे झेल देण्यास भाग पाडले. विराटने 55 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 52 धावांची खेळी साकारली.
हेही वाचा - Champions Trophy 2025: बुमराह चॅम्पियन ट्रॉफीतून बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का; 'हा' बदली खेळाडू संघात
विराट बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यरने इंग्लंडच्या गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडलं. त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. गिल-अय्यर जोडीने संघाला दोनशेचा टप्पा पार करून दिला. या दरम्यान शुबमन गिलने आपले व्यक्तिगत शतक पूर्ण केले. संघाची धावसंख्या 226 असताना गिल आदिल रशिदच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला. त्याने 102 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 112 धावांची खेळी साकारली. गिल पाठोपाठ अय्यर देखील बाद झाला. त्याला रशिदनेच पॅव्हेलियनमध्ये धाडलं. त्याने 64 चेंडूत 8 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांसह 78 धावांची ताबडतोड खेळी केली. यानंतर के एल राहुल याने मोर्चा सांभाळला. दुसऱ्या बाजूने हार्दिक पांड्या (17), अक्षर पटेल (13) ठराविक अंतराने बाद झाले. तर राहुल साकिब मोहम्मदचा बळी ठरला. त्याने 40 धावांचे योगदान दिले. खालच्या फळीतील फलंदाजांमुळे टीम इंडियाने 50 षटकात सर्वबाद 356 धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशिदने सर्वाधिक 4 गडी बाद केले.
हेही वाचा - गुजरात टायटन्सला मिळणार नवीन संघ मालक
विजयासाठी 357 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरूवात चांगली झाली. फिलीप सॉल्ट आणि बेन डकेत या जोडीने आक्रमक सुरूवात करत अवघ्या 6 षटकात बिनबाद 60 धावा धावफलकावर लावल्या. ही जोडी डोकेदुखी ठरणार असे चित्र असताना अर्शदीपने डकेतची (35) शिकार केली. त्यानंतर त्याने सॉल्टला (23) माघारी धाडलं. चौथ्या गड्यासाठी टॉम बॅनटोन आणि जो रूटने 46 धावांची भागिदारी केली.
कुलदीपने टॉमला (38) बाद करत ही जोडी फोडली. ही जोडी फुटल्यानंतर इंग्लंडची फलंदाजी गडगडली. जो रूट (24), हॅरी ब्रुक (19), जोस बटलर (6), लिव्हींगस्टोन (9), रशिद (0), वूड (9), महम्मद (2) स्वस्तात निपटले. गस ॲटकिन्सने 38 धावा करत थोडाफार प्रतिकार केला. पण भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडची फलंदाजी कापून काढली. अर्शदीप, हर्षित, अक्षर, हार्दिक यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. तर सुंदर आणि कुलदीप यांनी प्रत्येकी 1-1 गडी टिपला. अखेरीस इंग्लंडचा संघ ३४.२ षटकार सर्वबाद 214 धावांपर्यंत पोहचू शकला आणि भारताने हा सामना १४२ धावांनी जिंकला.