Cricket News: भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबत बीसीसीआयने अखेर मौन सोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या निवृत्तीबाबत अनेक चर्चा रंगत होत्या. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता हे दोघे फक्त वनडे स्वरूपात भारताचं प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, वनडे संघात कायम राहण्यासाठी बीसीसीआयने त्यांच्यासमोर काही नवे अटी टाकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विराट आणि रोहित यांना विजय हझारे ट्रॉफीत खेळणे बंधनकारक केले आहे. केवळ यावरच थांबता, त्यांना भारताच्या ‘अ’ संघातूनही खेळण्याचा सल्ला दिला गेला आहे. हे दोन्ही निर्णय अनुभवी खेळाडूंसाठी धक्कादायक ठरू शकतात, कारण त्यांच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर स्थानिक व ‘अ’ संघात खेळणं त्यांच्यासाठी नवं आव्हान असेल.
याशिवाय, सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयने अलीकडेच या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भवितव्याबाबत स्पष्ट मत मांडण्यास सांगितले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वीही अशा प्रकारची विचारणा झाली होती, ज्यामुळे कसोटी क्रिकेटमधून त्यांच्या निवृत्तीचा मार्ग मोकळा झाला. आता पुन्हा एकदा, पुढच्या वनडे मालिकांबाबत तुम्ही किती काळ खेळणार आणि तुमची तयारी काय आहे, याबाबत थेट प्रश्न विचारले गेले आहेत.
बीसीसीआयच्या या पावलामागे अनेक कारणं असू शकतात. एकीकडे, संघात नव्या खेळाडूंना संधी देण्याचा विचार आहे, तर दुसरीकडे, मोठ्या स्पर्धांपूर्वी अनुभवी खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस तपासण्याची गरज आहे. विराट आणि रोहित यांची कारकीर्द मोठ्या यशांनी भरलेली असली, तरी वय, व्यस्त वेळापत्रक आणि शारीरिक तंदुरुस्ती यामुळे निवड समितीला पुढच्या धोरणाबाबत विचार करावा लागत आहे.
आगामी महिन्यांत भारताची महत्त्वाची वनडे मालिका होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला या दोन्ही खेळाडूंनी आपला निर्णय स्पष्ट करावा, अशी इच्छा आहे. चाहत्यांच्या दृष्टीनेही हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे कारण विराट-रोहित जोडी अनेक वर्षे भारताचा कणा राहिली आहे. त्यांचे मैदानावरील योगदान आणि नेतृत्वामुळे संघाने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत.
सध्या बीसीसीआयच्या या हालचालींवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही जणांना वाटतं की, हा योग्य निर्णय आहे, कारण संघात नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल. तर काही चाहत्यांना यामुळे निराशा वाटते, कारण ते अजून काही वर्षे या जोडीला खेळताना पाहू इच्छितात.
आता सगळ्यांच्या नजरा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या उत्तराकडे लागल्या आहेत. त्यांनी वनडे क्रिकेटमधील आपला प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना नवीन अटींसह आपली जागा टिकवावी लागेल. आणि जर त्यांनी निवृत्तीचा मार्ग निवडला, तर भारतीय क्रिकेटच्या एका सुवर्णयुगाला निरोप द्यावा लागेल.
आगामी दिवसांमध्ये हा विषय आणखी रंग घेणार आहे, हे निश्चित. कारण विराट-रोहित यांच्याबाबतचा कोणताही निर्णय हा फक्त क्रिकेटपुरता मर्यादित न राहता, लाखो चाहत्यांच्या भावना आणि भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.