IPL 2025: वेळापत्रक जाहीर, 8 संघांचे कर्णधार ठरले, पण KKR आणि DC कर्णधार कोण?
बहुचर्चित आयपीएल 2025 च्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 22 मार्च रोजी उद्धाटनाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. या हंगामासाठी 10 पैकी 8 संघांनी आपल्या कर्णधारांची निवड केली आहे. पण कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी अद्याप आपल्या कर्णधारांची घोषणा केलेली नाही. या संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत कोणते खेळाडू आहेत, याचा आढावा पाहुयात..
हेही वाचा - मुजीब उर रहमान गझनफरची जागा घेतली, मुंबई इंडियन्सच्या संघात महत्त्वाचा बदल
KKR संघाचा ‘सेनापती’ कोण?
गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सनं मागील हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली होती. पण संघानं अय्यरला लिलावापूर्वी रिलीज केलं आहे. त्यामुळं यंदा संघाचं नवे नेतृत्व कोणाकडे जाईल याकडं सर्वांच्या नजरा आहेत. KKR ने 23.25 कोटी रूपयांची मोठी रक्कम मोजून व्यंकटेश अय्यरला संघात कायम ठेवले आहे. त्यामुळं तो कर्णधारपदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. त्याचबरोबर संघात रिंकू सिंह, सुनील नरेन आणि अनुभवी अजिंक्य रहाणे यांची नावेही चर्चेत आहेत. अजिंक्य रहाणेला शेवटच्या टप्प्यात संघात स्थान मिळाले आहे. त्याला ऐनवेळी 'सरप्राइझ कर्णधार' बनवलं जाऊ शकतं. रणजी ट्रॉफीमध्ये प्रभावी नेतृत्व करणाऱ्या रहाणेच्या अनुभवाचा फायदा संघाला होऊ शकतो.
हेही वाचा - WPL 2025 : RCB ने रचला इतिहास! WPL मध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा केला यशस्वी पाठलाग
दिल्लीच्या कर्णधार पदाच्या शर्यतीत दिग्गज नावे
दिल्ली कॅपिटल्स संघ नवा कर्णधार शोधत आहे. या शर्यतीत तीन प्रमुख दावेदार आहेत. यात लोकेश राहुल, अक्षर पटेल आणि फाफ ड्युप्लेसिस यांची नावे चर्चेत आहेत. फाफ ड्युप्लेसिसने मागील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व केलं होतं. त्याचा मोठा अनुभव दिल्लीसाठी उपयुक्त ठरू शकतो. दुसरीकडं लोकेश राहुलनं पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्ससाठी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळं तोही मुख्य दावेदार आहे. अक्षर पटेलचे नाव देखील या शर्यतीत आहे.
१० पैकी ८ संघाचे कर्णधार ठरले
आयपीएलच्या २०२५ हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाडला कर्णधार म्हणून निवडले आहे. तर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला कर्णधार बनवलं आहे. राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनकडं आहे. तर सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सवर विश्वास दाखवला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रजत पाटीदारला जबाबदारी दिली आहे.