IPL 2025 मधून कर्णधार ऋतुराज गायकवाड बाहेर, MS Dhoni करणार CSK चं नेतृत्व
महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचं सद्या नेतृत्व करणारा ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएल 2025 च्या संपूर्ण हंगामाबाहेर पडला आहे. त्याच्या जागी पुन्हा एकदा 'थाला' महेंद्रसिंग धोनी कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. CSK चे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, ‘गुवाहाटीमध्ये गायकवाडला दुखापत झाली. त्याला खूप वेदना होत होत्या. तेव्हा आम्ही त्याचा एक्स-रे केला. यात दुखापत स्पष्ट होत नव्हती. त्यामुळं आम्ही त्याचा एमआरआय केला. त्यामध्ये त्याच्या कोपरात आणि रेडियल नेकमध्ये फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले. ही दुखापत गंभीर असल्यानं तो खेळू शकत नाही.’
ऋतुराजबाबत आम्ही निराश आहोत. खेळण्यासाठी त्याने केलेल्या प्रयत्नांचे आम्हाला कौतुक आहे. पण दुर्दैवानं तो आतापासून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आमच्याकडे महेंद्रसिंग धोनी आहे. तो उर्वरित आयपीएलसाठी CSK संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल, असं देखील फ्लेमिंग यांनी सांगितलं.
गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. प्रथमदर्शनी ती दुखापत किरकोळ वाटत होती. पण तपासणीनंतर त्याच्या कोपराला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे.
हेही वाचा - माजी क्रिकेटपटू केदार जाधवसह मनसे, काँग्रेस, उबाठाच्या कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश
ऋतुराज आयपीएल 2025 मधून बाहेर पडल्याने CSK संघासाठी हा मोठा धक्का बसला आहे. पण महेंद्रसिंग धोनीकडं आता संघाचं नेतृत्व आल्यानं, धोनीचे चाहते जाम खूश झाले आहेत. उद्या शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापासून धोनीचा कॅप्टन कूल अवतार पुन्हा एकदा IPL च्या रंगमंचावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
हेही वाचा - Indian Cricketer Wife: 'या' आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी
धोनी IPl इतिहासातील सर्वात यशस्वी
IPL 2023 च्या अंतिम सामन्यानंतर धोनीने कर्णधारपद सोडलं होतं. गुजरात टायटन्सविरुद्धच्या त्या अंतिम लढतीत रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार ठोकून संघाला पाचवा IPL किताब मिळवून दिला होता. धोनीने आजवर 235 वेळा CSK चे नेतृत्व केलं आहे.
कर्णधार म्हणून धोनीची कामगिरी
महेंद्र सिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचं काही काळ (RPSG) कर्णधारपद भूषवलं आहे. धोनीने IPL मध्ये 133 सामने जिंकले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने पाच वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे. धोनी शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्यानं आपले अचूक निर्णय आणि संघ व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर सर्वाधिक सामने जिंकून दिले आहेत. तो IPL मधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे.