Wednesday, August 20, 2025 01:24:47 PM

Ranji Trophy: विदर्भचा ऐतिहासिक 'रणजी' विजय! करुण नायरच्या शतकी खेळीने गाजवली फायनल

कर्णधार करुण नायरच्या शतकाच्या जोरावर विदर्भने तिसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. संपूर्ण हंगामात अजिंक्य राहत विदर्भने जेतेपदाचे खरे दावेदार असल्याचं सिद्ध केले.

ranji trophy विदर्भचा ऐतिहासिक रणजी विजय करुण नायरच्या शतकी खेळीने गाजवली फायनल
Ranji Trophy: विदर्भचा ऐतिहासिक 'रणजी' विजय! करुण नायरच्या शतकी खेळीने गाजवली फायनल

विदर्भ संघाने रणजी करंडकांवर तिसऱ्यांदा नाव कोरलं. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर रंगलेला विदर्भ आणि केरळ यांच्यातील अंतिम सामना अनिर्णित राहिला. या सामन्यातील पहिल्या डावात घेतलेल्या ३७ धावांच्या आघाडीच्या जोरावर विदर्भ संघाने रणजी करंडक आपल्या नावे केला. अंतिम सामन्यात करुण नायर आणि दानिश मालेवार यांच्या दोन्ही डावातील खेळी निर्णायक ठरल्या.

पहिल्या डावात केरळने नाणेफेक जिंकून विदर्भला प्रथम फलंदाजी दिली. विदर्भची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या २४ धावांवर तीन विकेट्स गेल्या. त्यामुळे संघ संकटात सापडला. तेव्हा करुण नायर आणि दानिश मालेवार यांनी संघाची धुरा सांभाळत चौथ्या विकेटसाठी २१५ धावांची भागीदारी रचली.

दानिश मालेवारने जबरदस्त खेळ करत १५ चौकार आणि ३ षटकारांसह १५३ धावांची खेळी साकारली. तर करुण नायर ८६ धावांवर धावचीत झाला. पण त्याच्या संयमी खेळीने संघाच्या डावाला आकार मिळाला. शेवटच्या फळीत नचिकेत भुटेने ३२ धावा जोडत विदर्भला ३७९ धावांपर्यंत पोहोचवलं. केरळकडून निधीश एमडी आणि एडन अॅपल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

केरळच्या फलंदाजांची चांगलाच प्रतिकार केला. कर्णधार सचिन बेबीने संयमी खेळ करत ९८ धावा केल्या. त्याच्याबरोबर आदित्य सरवटेने ७९ धावांची खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेलं. पण विदर्भच्या गोलंदाजांनी योग्य क्षणी महत्त्वाच्या विकेट्स घेत केरळला ३४२ धावांवर रोखलं. दर्शन नालकांडे, हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत निर्णायक कामगिरी बजावली. परिणामी, पहिल्या डावात विदर्भला ३७ धावांची लहानशी पण महत्त्वाची आघाडी मिळाली.

हेही वाचा - ENG vs SA : इंग्लंडचा लाजीरवाणा पराभव, आफ्रिका थाटात सेमीफायनलमध्ये, अफगाण बाहेर

विदर्भच्या दुसऱ्या डावाचीही सुरुवात खराब झाली. तेव्हा करुण नायर पुन्हा एकदा संकटमोचक ठरला. पहिल्या डावात ८६ धावा करणाऱ्या नायरने या वेळी संपूर्ण संयम राखत १३५ धावांची खेळी केली. त्याने १० चौकार आणि २ षटकारांसह ही खेळी साकारली. दानिश मालेवारने ७३ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. शेवटच्या फळीत यश राठोड (२४), अक्षय वाडकर (२५), अक्षय कर्णेवार (३०) आणि दर्शन नालकांडे (५१) यांनी उपयुक्त योगदान देत विदर्भला ३७५ धावांपर्यंत नेलं. विदर्भची आघाडी वाढत गेल्यामुळे सामना अनिर्णित जाहीर करण्यात आला आणि विदर्भ विजेता ठरला.

हेही वाचा - Champion Trophy 2025: वसीम अक्रम पाकिस्तान क्रिकेट संघावर चिडला..

केरळचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं  
केरळने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सचिन बेबीच्या नेतृत्वाखाली त्यांनी संपूर्ण हंगामात दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यातही त्यांनी जिगरबाज खेळ केला. मात्र पहिल्या डावातील आघाडीचा फटका बसला.
 


सम्बन्धित सामग्री