WhatsApp Web: आजच्या डिजिटल युगात संवादासाठी व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप आहे. मोबाईलसोबतच अनेक जण कामाच्या सोयीसाठी WhatsApp Web चा वापर करतात. मात्र, आता भारत सरकारने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) यांनी जाहीर केलेल्या सल्लागार सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे की, ऑफिसच्या लॅपटॉप किंवा संगणकावर WhatsApp Web वापरणे टाळावे.सरकारच्या म्हणण्यानुसार, कामाच्या वेळेत वैयक्तिक मेसेजेस पाहण्यासाठी किंवा फाईल्स एक्सेस करण्यासाठी WhatsApp Web सोयीचा वाटू शकतो, पण हा तुमच्या वैयक्तिक गोपनीयतेसाठी धोकादायक ठरू शकतो. ऑफिस नेटवर्कवर WhatsApp Web वापरल्यास, तुमचे पर्सनल चॅट्स, मीडिया फाईल्स, आणि कॉन्टॅक्ट्स ऑफिस आयटी टीम किंवा सिस्टम अॅडमिनपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.
हेही वाचा:Aadhaar Update: मोबाईलवरून घरबसल्या आधार अपडेट करा, सोपी आणि जलद ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्या
प्रायव्हसीला धोका
सरकारी सल्ल्यानुसार, स्क्रीन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर, मॅलवेअर किंवा ब्राउझर हायजॅकिंगद्वारे ऑफिस नेटवर्कवर तुमच्या WhatsApp चॅट्सवर नजर ठेवली जाऊ शकते. जर कंपनीने सिक्युरिटी सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले असेल, तर ते तुमच्या ब्राउझरवरील प्रत्येक अॅक्टिव्हिटी लॉग करू शकते. याचा अर्थ, तुमचे खासगी मेसेजेस देखील कंपनीच्या रेकॉर्डमध्ये जाऊ शकतात.
वाढते सायबर धोके
Information Security Awareness (ISEA) टीमनुसार, अनेक कंपन्या आता WhatsApp Web ला संभाव्य सुरक्षा धोका मानत आहेत. हे हॅकर्ससाठी ‘गेटवे’ बनू शकते ज्यामुळे संपूर्ण कॉर्पोरेट नेटवर्क धोक्यात येऊ शकते. यामधून फिशिंग अटॅक किंवा मॅलवेअर हल्ला होण्याची शक्यता वाढते. एकदा नेटवर्क हॅक झाले, की केवळ वैयक्तिकच नव्हे तर कंपनीचीही गोपनीय माहिती लीक होऊ शकते.
ऑफिस वाय-फायमधूनही धोका
मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, केवळ ऑफिस डिव्हाइसवरच नाही तर ऑफिस वाय-फायद्वारे WhatsApp Web वापरत असाल, तरीही धोका संभवतो. अनेक वेळा कंपनीचे नेटवर्क अशा प्रकारे सेट केलेले असते की त्यातून कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मोबाईलवरील काही माहितीपर्यंत पोहोचता येते. तसेच, जर ऑफिस लॅपटॉप हॅक झाला, तर असुरक्षित वाय-फाय नेटवर्कवरून तुमचा डेटा ‘डेटा ब्रीच’चा बळी ठरू शकतो.
हेही वाचा:AI Security Risks: तुमचं घर AI च्या रडारवर आहे का? Google Gemini च्या धक्कादायक डेमोने वाढवल्या चिंता
सुरक्षिततेसाठी काय करावे?
जर कामाच्या गरजेमुळे ऑफिस लॅपटॉपवर WhatsApp Web वापरणे भागच पडत असेल, तर सरकारने काही खबरदारीचे उपाय सुचवले आहेत:
1. डेस्क सोडण्यापूर्वी नेहमी WhatsApp Web मधून लॉगआउट करा.
2. अनोळखी व्यक्तीकडून आलेले लिंक किंवा अटॅचमेंट उघडू नका.
3. कंपनीची आयटी आणि डेटा पॉलिसी नीट समजून घ्या व त्यानुसारच काम करा.
4. सिक्युरिटी अपडेट्स वेळोवेळी इन्स्टॉल करा.
5. वैयक्तिक चॅट्ससाठी वैयक्तिक डिव्हाइसच वापरा.
डिजिटल सुविधा आपले काम नक्कीच सोपे करतात, पण त्याचवेळी गोपनीयतेचा आणि सायबर सुरक्षिततेचा धोका वाढवतात. सरकारचा हा इशारा हलक्यात न घेता प्रत्येकाने त्याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा, थोड्या सोयीसाठी तुमचा वैयक्तिक डेटा आणि कंपनीची गुप्त माहिती हॅकर्सच्या हाती जाऊ शकते.