मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यात आक्रमक आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशारा देत सांगितलं की, 'मुंबईतून मरण नाही, तर विजय घेऊनच परत येणार' येत्या 29 ऑगस्टला मराठा समाज मुंबईकडे मोर्चा वळवणार असून, लाखोंच्या संख्येने आंदोलक राजधानीत दाखल होणार आहेत.
मनोज जरांगे यांनी जाहीर केलं की, 'या वेळी आम्ही मागे हटणार नाही. सरकारला सळो की पळो करून सोडू.' त्यांनी स्पष्ट सांगितलं की, एकदा अंतरवाली सराटी गाव सोडलं, की आता कुठेही थांबणार नाही. आंदोलकांनी राज्यातील सर्व आमदार, खासदार तसेच मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली व्यथा पोहोचवली आहे.
जरांगे यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत सांगितलं की, 'सर्वसामान्य मराठा समाजाचा संताप उफाळून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा निर्णय त्वरीत घ्यावा, अन्यथा आंदोलन बळकट होईल.'
हेही वाचा: अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांना काळं फासून निषेध
त्याचप्रमाणे त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही गंभीर आरोप केले. 'शिरसाट आमच्याशी डबल गेम खेळतील असं वाटलं नव्हतं. त्यांनी तातडीने मराठा समाजाच्या प्रमाणपत्र वैधतेबाबत स्पष्ट आदेश द्यावेत, अन्यथा रोष ओढवून घेतील,' असा इशाराही जरांगेंनी दिला.
'सर्व आमदार, खासदार गप्प आहेत. कोणीही समाजासाठी बोलत नाही. समाजाने आता डोळे उघडले पाहिजेत. हे आरक्षण आमचं हक्काचं आहे आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,' असेही ते म्हणाले.
मराठा समाजाचा हा संघर्ष केवळ आरक्षणापुरता मर्यादित नसून, त्यांच्या अस्तित्वासाठीचा लढा असल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. येत्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकारची कसोटी लागणार आहे.