सुरत : विक्षिप्त माणसांचं काही सांगता येत नाही. असे लोक लहानशा गोष्टीवरून किती मोठे नुकसान करणारे आणि किती चुकीचे निर्णय घेऊ शकतात, याचा अनुभव अनेकांना आला असेल. मात्र, या लोकांना स्वतःच्या अशा वागण्याचं काहीही वाटत नसतं. यांचं कधी कुणाबरोबर काय फिसकटेल याचा नेम नसतो. शिवाय, एक झाला की दुसरा कारनामा करायला ते तयारच असतात. अशा लोकांचं मन सांभाळायचं तर आणखीनच कठीण..
गुजरातमधील सुरतमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरतमध्ये एका विवाह सोहळ्यात लहानशा कारणावरून विवाहच रद्द होण्याची वेळ येऊन ठेपली होती. लग्नामुळे वधू-वर आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये आयुष्यभरासाठी नवे संबंध जोडले जातात. तेव्हा छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये काहीतरी कमी-जास्त व्हायचंच. नेमकं असंच या लग्नसोहळ्यात घडलं.
हेही वाचा - Viral News : नवरदेवाने स्वत:च्या लग्नात ‘या’ गाण्यावर केलं नृत्य; मुलीच्या वडिलांनी लग्नच मोडलं!
जेवणाच्या वेळी पाहुण्यांमध्ये जेवायला बसण्यासाठी गडबड सुरू झाली. नंतर जेवणाची कमतरता भासल्याचं लक्षात आलं. यादरम्यानच, पाहुण्यांमध्ये थोडासा वाद सुरू झाला. हे सर्व वराच्या कुटुंबीयांच्या कानावर गेलं. त्यामुळे त्यांचा राग इतका अनावर झाला की, त्यांनी चक्क विवाह रद्द करण्यात आल्याची घोषणा केली.
लग्नाची संपूर्ण तयार झाली होती. पाहुणे मंडळी देखील आली होती. लग्नमंडपात वधू-वरांनी लग्नाचे जवळपास सर्व विधी पूर्ण केले होते. मात्र, त्यानंतर वराचे कुटुंबाने अचानक चालू असलेल्या लग्नाच्या विधींना थांबवलं. याचं कारण वराकडील पाहुण्यांना जेवण न दिल्याचे त्यांनी सांगितलं. वराच्या कुटुंबाने नातेवाईक आणि पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या कमतरतेमुळे हा सोहळा अचानक थांबवला. बहुतेक विधी पूर्ण झाले होते. फक्त हार घालणं बाकी होतं. अशा वेळेस अचानकपणे लग्नच रद्द करण्याचा प्रकार घडला.
विवाह रद्द करण्याच्या प्रकारामुळे या ठिकाणी गोंधळ उडाला. वधूच्या कुटुंबीयांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. यानंतर वराच्या कुटुंबीयांना काही पाहुण्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अनेकदा, समजावूनही वरपक्षातील लोक ऐकत नाहीत असे पाहून वधू आणि तिचे कुटुंबीयही संतापले. त्यांनी थेट पोलिसातच तक्रार केली. त्यानंतर चक्क पोलीस ठाण्यातच विवाह सोहळा पार पडला.
हेही वाचा - World Cancer Day : धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढला! 'हे' आहे भयावह स्थितीचं कारण
वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे मागितली मदत
जेवण कमी पडल्याने वराच्या कुटुंबीयांनी रद्द करण्याचा प्रकार केल्याने वधूसह तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला. वराच्या कुटुंबीयांच्या अशा वागण्यामुळे नाराज झालेल्या वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. त्या पोलिसांत गेल्यानंतर वराच्या नातेवाईकांनी समारंभास सहमती दर्शविली. मात्र, वधूच्या कुटुंबाने कार्यक्रमस्थळी परत आल्यास आणखी मतभेदाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यामुळे पोलीस ठाण्यातच लग्न लावण्यात आलं. दरम्यान, वधू आणि वराच्या भवितव्याचा विचार करून पोलिसांनी हस्तक्षेप करत लग्नासाठी मदत केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या संपूर्ण घटनेची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे.