Thursday, September 04, 2025 04:56:40 AM

बलुचिस्तानमध्ये 7 बस प्रवाशांची गोळ्या घालून हत्या; अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केला हल्ला

बंदूकधाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेड उभारून बस थांबवली, प्रवाशांची ओळखपत्रे तपासली आणि सात जणांना जबरदस्तीने जवळच्या टेकडीवर नेले. त्यानंतर गोळीबाराचा आवाज ऐकू आला.

बलुचिस्तानमध्ये 7 बस प्रवाशांची गोळ्या घालून हत्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केला हल्ला
Bus Passengers Shot Dead In Balochistan
प्रतिकात्मक /संपादित प्रतिमा

Bus Passengers Shot Dead In Balochistan: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बुधवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बसमधील किमान सात प्रवाशांची गोळ्या घालून हत्या केली. प्रांतीय राजधानी क्वेट्टाहून पंजाब प्रांताकडे जाणाऱ्या प्रवासी बसला बंदूकधाऱ्यांनी लक्ष्य केले. ही घटना बरखान परिसरात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, बंदूकधाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेड उभारून बस थांबवली, प्रवाशांची ओळखपत्रे तपासली आणि सात जणांना जबरदस्तीने जवळच्या टेकडीवर नेले. त्यानंतर गोळीबाराचा आवाज ऐकू आला, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. 

बरखानचे पोलिस उपायुक्त वकार खुर्शीद आलम यांनी घटनेची आणि मृतांच्या संख्येची पुष्टी केली. त्यांनी सांगितलं की, बसमध्ये बसलेले सात जण जे ठार झाले ते सर्व पंजाब प्रांताचे रहिवासी होते. ते लाहोरला जात होते. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसरात धाव घेतली आणि मारेकऱ्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. 

हेही वाचा - म्याँव म्याँव.. मांजरीनं चपळाईनं केलं विमान हायजॅक; उड्डाण झालं 2 दिवस लेट, हुश्श.. अखेर अशी आली बाहेर..

मुख्यमंत्री सरफराज बुगती यांच्याकडून निषेध - 

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. परंतु जातीय बलुच दहशतवादी गट नियमितपणे शेजारच्या पंजाबमधील लोकांवर हल्ला करतात. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याचे आश्वासन दिले. 

हेही वाचा - 'पाकिस्तान पुन्हा तुटेल.. पुन्हा 1971 सारखीच स्थिती' संसदेत भारत-बांग्लादेशचा उल्लेख करत पाक खासदारानं व्यक्त केली भीती

राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. निरपराध लोकांची हत्या करणे हे भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे.  दहशतवादी हे शांतता आणि मानवतेचे शत्रू आहेत. त्यांना बलुचिस्तानमधील शांतता भंग करायची आहे, असं राष्ट्रपती झरदारी यांनी सांगितलं. तसेच पंतप्रधान शरीफ यांनी म्हटलं आहे की, निरपराध नागरिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. देशातून दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी सरकार आणि सुरक्षा दल सक्रियपणे काम करत आहेत.


सम्बन्धित सामग्री