Earthquake In Russia प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
मॉस्को: रशियामध्ये आज तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. रशियाच्या पॅसिफिक ऑफशोअर प्रदेशात हा भूकंप झाला. एकदा नाही तर दोनदा झालेल्या या भूकंपामुळे लोक घाबरले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी होती. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे.
त्सुनामीचा इशारा -
या भूकंपानंतर, पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने रशियाच्या कामचटका द्वीपकल्पासाठी इशारा जारी केला आहे. रविवारी समुद्रात दोन भूकंप झाले. त्यापैकी सर्वात मोठा भूकंप 7.4 तीव्रतेचा होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू 20 किलोमीटर खोलीवर होता. तथापी, यानंतर काही मिनिटांपूर्वी, याच भागात 6.7 तीव्रतेचा आणखी एक भूकंपही नोंदवण्यात आला होता.
जर्मन भूगर्भीय केंद्राने दिली माहिती -
दरम्यान, जर्मन भूगर्भीय संशोधन केंद्राने (GFZ) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे रशियाच्या पूर्वेकडील कामचटका किनाऱ्याजवळ 6.5 पेक्षा जास्त तीव्रतेचे दोन भूकंप झाल्याचे सूचित केले आहे. भूकंपांची तीव्रता 6.6 आणि 6.7 इतकी मोजण्यात आली आणि दोन्ही भूकंपांच्या केंद्राची खोली 10 किलोमीटर इतकी मोजण्यात आली. तथापी, भूकंपामुळे कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.
ज्वालामुखीचा उद्रेक -
रशियन वृत्तसंस्था TASS ने भूकंपानंतर कामचटका येथे शिवेलुच ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे वृत्त दिले आहे. ज्वालामुखीतून लावा बाहेर आला. त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात राखेचे ढग आकाशात पसरले असून यामुळे परिसरातील वातावरणात प्रदूषण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रशियात भूकंप का होतात?
रशियाचा कामचटका द्वीपकल्प पॅसिफिक आणि युरेशियन प्लेटवर वसलेला आहे, ज्यामुळे हा भाग भूकंप आणि ज्वालामुखीसाठी अतिशय संवेदनशील आहे. रशियाचा हा भाग पॅसिफिक महासागराच्या 'रिंग ऑफ फायर'चा देखील एक भाग आहे. रशियातील कामचटका द्वीपकल्प, कुरिल बेटे आणि बैकल रिफ्ट सारख्या भागात अनेकदा भूकंप होतात. रशियातील आतापर्यंतचा सर्वात भयानक आणि विनाशकारी भूकंप 5 नोव्हेंबर 1952 रोजी कामचटका येथे झाला होता, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 9 होती. या भूकंपामुळे पॅसिफिक महासागरात विनाशकारी त्सुनामी आली होती.