Thursday, August 21, 2025 12:10:18 AM

Pakistan Bus Attack: पाकिस्तानात ओळखपत्र पाहून 9 पंजाबी प्रवाशांची हत्या

पोलिसांनी सर्व मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांना बरखान जिल्ह्यातील रेखानी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, अधिकाऱ्यांनी या घटनेचे वर्णन दहशतवादी घटना म्हणून केले आहे.

pakistan bus attack पाकिस्तानात ओळखपत्र पाहून 9 पंजाबी प्रवाशांची हत्या
Pakistan Bus Attack प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

इस्लामाबाद: पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये हल्लेखोरांनी एका बसला थांबवून 9 प्रवाशांची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बलुचिस्तानच्या झोब भागात घडली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, बस कलेताहून लाहोरला जात होती. यादरम्यान हल्लेखोरांनी बस थांबवली आणि ओळखपत्रांच्या आधारे प्रवाशांची ओळख पटवली, त्यानंतर पंजाबमधील प्रवाशांना बसमधून उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांना अज्ञात ठिकाणी नेऊन ठार मारण्यात आले.

पोलिसांनी सर्व मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांना बरखान जिल्ह्यातील रेखानी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, अधिकाऱ्यांनी या घटनेचे वर्णन दहशतवादी घटना म्हणून केले आहे. सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांचेही विधान समोर आले आहे. त्यांनी या कृत्याचे वर्णन दहशतवादी कृत्य असं केलं आहे. 

अपहरण झालेल्या प्रवाशांपैकी बहुतेक जण मंडी बहाउद्दीन, गुजरांवाला आणि वझिराबाद येथील रहिवासी असल्याचे आढळून आले आहे. अपहरणानंतर एक ते दीड तासाच्या आत त्यांचे मृतदेह जवळच्या डोंगराळ भागात एका पुलाखाली सापडले. सर्वांना जवळून गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. स्थानिक उपायुक्त हबीबुल्ला मुसाखेल यांच्या मते, हल्लेखोरांची संख्या सुमारे 10 ते 12 होती. त्यांनी सुरक्षा दलांवर रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (आरपीजी) आणि स्वयंचलित शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. 

हेही वाचा - कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबार; 'या' दहशतवाद्याने स्विकारली जबाबदारी

दरम्यान, पाकिस्तान सरकार आणि बलुचिस्तान प्रशासनाने याला सुनियोजित दहशतवादी हल्ला म्हटले असून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच लवकरच दोषींना पकडण्याचे आणि त्यांना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले. 

हेही वाचा - लँडिंग दरम्यान 2 विमानांची टक्कर! कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थी पायलटचा मृत्यू

बलुच बंडखोरांनी यापूर्वी क्वेटा, मास्टुंग आणि लोरालाई येथेही हल्ला केला होता. यापूर्वी पंजाब प्रांतातील गर्दीच्या बाजारात एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले होते. या हल्ल्यात 15 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते.
 


सम्बन्धित सामग्री