Thursday, August 21, 2025 02:26:43 AM

Blue Ghost Mission: अमेरिकेचे ब्लू घोस्ट लँडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज; अनेक रहस्ये उलगडणार, काय आहे खास? जाणून घ्या

ब्लू घोस्ट मिशन 1 अभियान नासाच्या सहकार्याने राबवले जात आहे. ही मोहिम 15 जानेवारी रोजी सुरू करण्यात आली. घोस्ट रायडर्स इन द स्काय म्हणून ओळखले जाणारे फायरफ्लायचे हे मिशन अनेक प्रकारे अद्भुत आहे.

blue ghost mission अमेरिकेचे ब्लू घोस्ट लँडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज अनेक रहस्ये उलगडणार काय आहे खास जाणून घ्या
Blue Ghost Mission 1 Lunar Landing
Edited, Twitter Image

Blue Ghost Mission: अमेरिकन कंपनी फायरफ्लाय एरोस्पेसचे ब्लू घोस्ट मिशन 1 (Blue Ghost Mission) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज आहे. कंपनीचे लँडर 2 मार्च रोजी चंद्रावर उतरेल. लँडिंग करण्यापूर्वी, लँडरने चंद्रापासून सुमारे 100 किमी उंचीवरून काही छायाचित्रे पाठवली आहेत. कंपनीने हे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. जर लँडर चंद्रावर यशस्वीरित्या उतरला तर नासा फायरफ्लायला 101.5 दशलक्ष डॉलर्स देईल. ब्लू घोस्ट मिशन 1 चा भाग म्हणून, लँडर रविवारी अमेरिकेच्या वेळेनुसार पहाटे 3:34 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. यानंतर लँडर मोन्स लॅट्रेल नावाच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करेल. 

लँडरने पाठवली पृथ्वी आणि चंद्राची छायाचित्र -  

ब्लू घोस्ट मिशन 1 अभियान नासाच्या सहकार्याने राबवले जात आहे. ही मोहिम 15 जानेवारी रोजी सुरू करण्यात आली. घोस्ट रायडर्स इन द स्काय म्हणून ओळखले जाणारे फायरफ्लायचे हे मिशन अनेक प्रकारे अद्भुत आहे. कंपनीच्या लँडरने त्याच्या प्रवासादरम्यान पृथ्वी आणि चंद्राचे अनेक नेत्रदीपक छायाचित्रे पाठवली आहेत.

हेही वाचा - Satellite Network: आता सॅटेलाइट नेटवर्कद्वारे मोबाईलवर व्हिडिओ कॉल करणं होणार शक्य; 'या' कंपनीची चाचणी यशस्वी

काय आहे ब्लू घोस्ट मिशन?  

ब्लू घोस्ट लँडरमध्ये 10 उपकरणे आहेत. यामध्ये चंद्रावरील मातीची चाचणी करण्यासाठी एक उपकरण, किरणोत्सर्ग सहन करणारा संगणक आणि चंद्रावरील नेव्हिगेशनसाठी विद्यमान जागतिक उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली समाविष्ट आहे. ब्लू घोस्टची रचना पूर्ण चंद्र दिवसाशी जुळवून घेण्यासाठी केली आहे. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांसारखा असतो. 14 मार्च रोजी पूर्ण चंद्रग्रहण आहे. त्यामुळे असं सांगण्यात येत आहे की, ब्लू घोस्ट चंद्रग्रहणाचे उच्च दर्जाचे फोटो त्यांच्या कॅमेऱ्यात टिपेल. ब्लू घोस्ट लँडर 16 मार्च रोजी चंद्रावर सूर्यास्ताची नोंद देखील करेल.

हेही वाचा - आता शेतीतही होणार AI चा वापर! Artificial Intelligence च्या मदतीने शेतकरी करू शकतात 'ही' काम

ब्लू घोस्ट लँडरची वैशिष्ट्ये - 

रचना: हे चार लँडिंग पाय असलेले बॉक्स-आकाराचे लँडर आहे.
पेलोड क्षमता: 155 किलो पर्यंत वैज्ञानिक उपकरणे वाहून नेण्याची क्षमता.
वीज स्रोत: सौर पॅनेल, जे 450 वॅट ते 650 वॅट वीज निर्माण करू शकतात.
थर्मल कंट्रोल: हीट पाईप्स, रेडिएटर्स, मल्टी-लेयर इन्सुलेशन आणि अॅक्टिव्ह हीटर्सने सुसज्ज.

ब्लू घोस्ट मोहिमेचे महत्त्व - 

हे अभियान चंद्र संशोधन, संसाधन चाचणी आणि भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी महत्त्वाचे ठरू शकते. नासाच्या या उपक्रमांतर्गत, खाजगी कंपन्यांना चंद्रावर संशोधन करण्याची संधी दिली जात आहे, ज्यामुळे भविष्यात मानवी मोहिमांना अधिक पाठिंबा मिळू शकेल. तथापि, ब्लू घोस्ट मिशन 1 हे चंद्रावरील अमेरिकेची उपस्थिती मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचा डेटा प्रदान करण्यासाठी एक महत्त्वाचे मिशन आहे. आता सर्वांच्या नजरा त्याच्या यशस्वी लँडिंगवर आहेत, ज्यामुळे अवकाश संशोधनाच्या इतिहासात आणखी एक नवीन अध्याय जोडता येईल. 
 


सम्बन्धित सामग्री